Home अश्रेणीबद्ध मेट्रोला पालिकेकडून विनानिविदा देणार जागा : स्थायीची मंजुरी

मेट्रोला पालिकेकडून विनानिविदा देणार जागा : स्थायीची मंजुरी

पुणे : स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये महामेट्रोलाबोपोडी येथील जागा विना निविदा देण्यास मंजुरी देण्यात आली. पार्किंग आणि स्थानकासाठी या जागेची आवश्यकता असल्याचे समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
महामेट्रोकडून पालिकेकडे यासंदर्भात प्रस्ताव आलेला होता. मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गालगत पार्किंग आणि स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. बोपोडी येथील जुना जकात नाका सर्व्हे नं. १० येथील सुमारे २ हजार ४०० चौरस मीटर जागा हस्तांतरीत करण्यासाठीचा हा प्रस्ताव होता. ही जाना तीन एकर, तीन गुंठे असून पालिकेने ही जागा जकात नाक्यासाठी संपादीत करुन ताब्यात घेतलेली होती. या जागेवर महापालिकेचा दवाखाना असून सुमारे २०० चौरस मीटर जागा पोलीस ठाण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहे. तर काही जागा रुंदीकरणामध्ये बाधित झाली आहे. उर्वरित जागा महामेट्रोला देण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. 
पालिका जागा देत असली तरी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. मिळकतीलगत सीमाभिंत बांधणे, जागेलगतच्या परिसराची देखभाल आणि संरक्षण करणे ही मेट्रोची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये पालिकेच्या आर्थिक दायित्वामधून जा जागेची सहा कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांची किंमत वजा करावी आणि स्वामित्वापोटी दरवर्षी एक रुपया नाममात्र भाडे आकारावे, ३० वर्ष कालावधीसाठी ही जागा हस्तांतरीत करण्याविषयी प्रशासनाने अभिप्राय दिला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.