Home बातम्या आंतरराष्ट्रीय मेळा मराठीचा जमला खासा!

मेळा मराठीचा जमला खासा!

0

डॅलस : 

उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १९वे अधिवेशन ११ ते १४ जुलै या काळात अमेरिकेतील डॅलसमध्ये थाटात पार पडले. बीएमेम अधिवेशन म्हणजे जणू जगन्नाथाचा रथ! शेकडो लोकांचा हातभार लागल्याने तो मार्गी लागला. 

अधिवेशनाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. अरुणा ढेरे म्हणजे मराठी साहित्यातील मानाचे पान! त्यांच्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिलीच, पण अध्यक्षीय भाषणात त्यांनी सौम्य, सात्विक भाषेत परंपरेचे आधुनिक रूप आणि समाज जोडण्यातला सहभाग स्पष्ट केला. ‘शब्दांच्या गावा जावे’ या कार्यक्रमात दीपाली केळकर यांनी मराठी भाषेच्या गमती सांगितल्या. अधिवेशनाची सुरुवातच आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर झाली. तेव्हा एका दालनात खास उभारलेल्या विठ्ठल मंदिरासमोर दणक्यात आरती झाली. ‘विठुचा गजर’ दुमदुमला. दुसऱ्या दिवशी सकाळी डॅलस शहराच्या रस्त्यावरून गौरवयात्रा निघाली. शिवाजी महाराज, संत परंपरा आणि मराठी साहित्यातील दिग्गजांच्या दिंडी, लेझीम पथक आणि ढोलताशांचा कडकडाट, फेटे, नऊवारी आणि नथी असे मराठमोळे पेहराव यात्रेत पाहायला मिळाले. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, सुप्रसिध्द प्लास्टिक सर्जन डॉ. रवीन थत्ते हे आमचे प्रमुख वक्ते होते. मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या मकरंदबुवा यांनी आपल्या कीर्तनातून सोप्या भाषेत ते भक्ती-ज्ञान-वैराग्य या त्रिसूत्रीची ओळख करून दिली. 

मालवणी, खानदेशी, कोल्हापुरी, पेशवाई अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या पदार्थांनी अधिवेशनातील भोजनात हजेरी लावली. सुबोध भावे यांच्याशी ‘रुबरू’ करायला किंवा संगीतकार अशोक पत्की यांचे ‘सप्तसूर’ ऐकायला नटूनथटून जाताना पेढे, अत्तर, मोगऱ्याचे गजरे यांनी स्वागत होत होतं. हृषिकेश जोशी यांची अफलातून कॉमेडी होती. त्यात मकरंद अनासपुरे, विशाखा सुभेदार, संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी, हेमांगी कवी अशा कलाकारांनी धमाल आणली. पंडित विजय कोपरकर आणि देवकी पंडित यांनी ‘स्वरनक्षत्र’ ही मैफल रंगवली, तर अश्विनी गोरे-देशपांडे यांनी ‘नाट्यस्वरांचा’ प्रवास घडवला. ‘डीअर आजो’ हे मयुरी देशमुख लिखित नाटक भारतातून खास आलं होतं. अमेरिकन नातीशी ‘नातं’ जुळवणारा आजोबा संजय मोने यांनी छान रंगवला. इथल्या ‘थिएट्रिक्स’ने पुलंच्या ‘बटाट्याच्या चाळीची’ सफर घडवली, तर ‘बिग बँग’ने ‘प्रेमाच्या गावा जावे’ असं सांगितलं. चारुहास पंडित यांचा ‘चिंटू’, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा पंचावन्न मिनिटांचा डाएट प्लॅन, डॉ. संजय उपाध्ये यांचे ‘मन प्रसन्न करणारे’ प्रवचन, धनश्री लेले यांचा ‘मेघदूताचा’ रसास्वाद ही श्रोत्यांसाठी खास आकर्षणं होती. आर्या आंबेकर आणि हृषिकेश रानडे यांच्या स्वरांनी ‘टिपूर टिपूर चांदणं’ पसरवलं. 

‘एनजीओ समिट’चे वेगळेपण 

यंदा प्रथमच आम्ही ‘एनजीओ समिट’ आयोजित केली होती. महाराष्ट्र फाऊंडेशन, पाणी फाऊंडेशन, हेलो मेडिकल फाऊंडेशन, मराठी विज्ञान परिषद अशा विविध संस्थांचा यात सहभाग होता. पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्बोधक चर्चा झाली. गेली दोन वर्षे संयोजक दिलीप राणे आणि सहसंयोजक हर्षद खाडिलकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे तीनशे कार्यकर्ते अधिवेशन यशस्वी करण्यासाठी झटत होते.