हायलाइट्स:
- करोनाचा प्रादुर्भाव कायम असलेले जिल्हे वगळून राज्य अनलॉक होणार
- मुंबई लोकलबाबत रेल्वे विभागाशी बोलून मुख्यमंत्री घेणार निर्णय
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
करोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर राज्यात लागू असलेले निर्बंध उठवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
२५ जिल्ह्यांतील निर्बंध उठणार!
‘महाराष्ट्रातील २५ जिल्हे ज्यांचा रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांमधील निर्बंध उठवण्याबाबत चर्चा झाली आहे. लेव्हल ३ चे जे निर्बंध होते, त्यामध्ये शनिवार आणि रविवारी दुकाने बंद ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र आता फक्त रविवारी दुकाने बंद ठेवून शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दुकांनाना परवानगी दिली जावी, याबाबत सकारात्मक चर्चा झाली,’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोणत्या ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम राहणार?
करोनाचा प्रादुर्भाव अजूनही जास्त असणाऱ्या ११ जिल्ह्यांना लेव्हल ३ मध्येच ठेवण्यात येईल. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. तसंच कोकणातील चार जिल्हे आणि मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहतील. हे जिल्हे वगळून राज्यातील इतर २५ जिल्ह्यांमधील निर्बंध लवकरच उठवले जातील, असं राजेश टोपे यांनी सागंतिलं आहे.
मुंबई लोकलबाबत काय निर्णय होणार?
मुंबई लोकलबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘आजच्या बैठकीत लोकलबाबत वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त करण्यात आली आहेत. लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री रेल्वे विभागाशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेतील.
दरम्यान, आज जी चर्चा झाली त्याबाबत आरोग्य विभाग आणि करोना टास्क फोर्सचा अहवाल आम्ही अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहोत. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. पुढील १-२ दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.