हायलाइट्स:
- देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
- दोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
- ईडीकडून देशमुखांना समन्स जारी
शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या घरांवर, तसेच कार्यालयांवर ईडीने छापे घातले. मुंबई व नागपुरात एकाच वेळी दहा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांची कालही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अनिल देशमुखांची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी आज ११ वाजता त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाचाः अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; दोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
दरम्यान, अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीकडून काल मध्यरात्री अटक करण्यात आली होती. आज दोघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे. स्वीय सहाय्यकांच्या अटकेनंतर अनिल देशमुखांना समन्स बजावण्यात आल्यानं देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या घराजवळ एका गाडीत स्फोटके सापडल्यानंतर, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी, ईडीने याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील चौकशी केली. अनिल देशमुख यांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांची याआधी चौकशी केली होती. त्या चौकशीनंतर शुक्रवारी छापे टाकण्यात आले.
वाचाः तिसऱ्या लाटेचं संकट; सोलापुरात २० बालकांना करोना