Home मनोरंजन मोठ्या पडद्यावर ‘करोना प्यार है’; चित्रपटांच्या शीर्षकांसाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ

मोठ्या पडद्यावर ‘करोना प्यार है’; चित्रपटांच्या शीर्षकांसाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ

0
मोठ्या पडद्यावर  ‘करोना प्यार है’;  चित्रपटांच्या शीर्षकांसाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ

[ad_1]

मुंबई टाइम्स टीम

गेल्या दीड वर्षापासून देशात करोना थैमान घालत आहे. सध्या करोनाचा कहर काहीसा कमी झाला असला तरीही हे संकट टळलेलं नाही. इतर व्यवसायाप्रमाणे मनोरंजनसृष्टीलादेखील लॉकडाउनचा फटका बसला. गेल्या काही महिन्यांमध्ये तर सिनेमा आणि मालिकेची घडीच विस्कटली होती. चित्रीकरणाच्या कामातदेखील अनेक अडचणी येत होत्या. सिनेमागृहंदेखील पुन्हा उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पण हे सगळं ज्याच्यामुळे झालं, तो ‘विषय’ आता मनोरंजनसृष्टीनं कथानकासाठी घेतला आहे. म्हणजेच येत्या काळात ‘करोना’, ‘व्हायरस’, ‘लॉकडाउन’ या विषयाशी निगडित कथानकाचे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

सिनेनिर्मात्यांनी आगामी सिनेमांच्या शीर्षकांकरिता ‘करोना’ या शब्दाची नोंदणी केली आहे. सिनेमांच्या नावांसाठी याच शब्दाला अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याचं निदर्शनास आलंय. सिनेमाची कथा ठरण्याअगोदरच सिनेमाचं शीर्षक आपल्या मालकीचं करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. त्यामुळेच प्रोडक्शन असोसिएशनकडे सिनेमांच्या नावाच्या नोंदणीचे अनेक अर्ज गेल्या वर्षभरात आले आहेत.

वास्तववादी विषयांवर सिनेमे बनवण्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा हातखंडा आहे. आजवर त्यांनी विविध वादग्रस्त विषय सिनेमाच्या पडद्यावर मांडले आहेत. आता त्यांनी करोना आणि लॉकडाउन या विषयाकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या वर्षी संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलं. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींवर उपासमारीची वेळ आली. तर काहींनी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटर पायपीट केली. या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर करत आहेत. ‘इंडिया लॉकडाउन’ असं या सिनेमाचं नाव असून याचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसेल. काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर अभिनेत्री स्पृहा जोशी अभिनित ‘पुन:श्च हरिओम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात लॉकडाउनमुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका कुटुंबाची व्यथा मांडण्यात आली.

नावासाठी काय पण!
अभिनेता हृतिक रोशनच्या ‘कहोना प्यार है’ या सिनेमाच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या ‘करोना प्यार है‘ या चित्रपटाचं शीर्षक इरॉस इंटरनॅशनलनं नोंदवलं आहे. याविषयी निर्मात्या कृषिका लुल्ला सांगतात की, ‘सध्या या सिनेमाच्या स्क्रिप्टिंगवर काम सुरू आहे. हा सिनेमा साथीच्या रोगांवर आणि प्रेमकथेवर आधारित असेल’. त्याचप्रमाणे आयएमपीपीए अर्थात ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन’कडेदेखील सिनेनिर्मात्यांनी करोनावर आधारित चित्रपटाच्या शीर्षकांची नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे नावाचे हक्क विकत घेण्यासाठी निर्माते लाखो रुपये मोजत असल्याचं कळतंय.

डॉक्टरांची गोष्ट
करोना आणि लॉकडाउन या विषयांसह ‘डॉक्टर’ या विषयावरदेखील सिनेमा, लघुपट, मालिका, वेब सीरिज लिहिल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काळात पडद्यावर करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचं चित्रण दिसल्यास वावगं वाटायला नको.
चित्रपटांची शीर्षकं आपल्या नावावर करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरु
० करोना संबंधित सिनेमांचे शीर्षक

– करोना व्हायरस

– कोविड १९

– करोना २०२०

– करोना लॉकडाउन

– करोना प्यार है

– वन वेपन करोना

– डेडली करोना

– करोना- दि डेडली व्हायरस

[ad_2]

Source link