Home बातम्या राष्ट्रीय मोदी यांच्या ध्यानधारणेच्या गुहेची बंपर बुकींग

मोदी यांच्या ध्यानधारणेच्या गुहेची बंपर बुकींग

डेहराडून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक निकालाआधी ध्यानसाधना केल्याने चर्चेत आलेल्या केदारनाथमधील गुहेला प्रंचड मागणी वाढली आहे. या गुहेत ध्यानसाधना करण्यासाठी भाविक बंपर बुकींग करीत असून पुढील 10 दिवसांसाठी या गुहेची बुकींग झाली आहे. 

केदारनाथला देवदर्शनासाठी आलेले अनेक जण आधीच या गुहेची ऑनलाइन बुकींग करीत आहेत. 24 तासांसाठी 1500 रुपये मोजायलाही लोक मागेपुढे पाहत नाहीत. यासाठी ते ऑनलाइन बुकींग करीत आहेत. विशेष म्हणजे ही गुहा खूप प्रसिद्ध झाली असून मोदी यांच्या ध्यानसाधनेनंतर 20 लोकांनी या ठिकाणी जाऊन ध्यानसाधना केली आहे. मोदी यांनी ध्यानसाधना केल्यानंतर देशभरातून या गुहेला मागणी वाढली आहे. सर्व बुकींग ऑनलाइन होत आहे. लोकांची मागणी वाढल्याने आम्हाला आता दुसरी एक गुहा बनवावी लागत आहे, असे गढवालमधील अधिकारी बी. एल. राणा यांनी सांगितले. ही गुहा संपूर्णपणे कृत्रिम नाही. त्यामुळे दुसरी गुहा बनवण्यासाठी आम्हाला वेळ लागत आहे. मोदी यांनी 18 मे रोजी पहिल्यांदा रुद्र मेडिटेशन गुहेत ध्यानसाधना केली होती. ही गुहा केदारनाथ मंदिरापासून एक किलोमीटर अंतराच्या उंचीवर आहे. या ठिकाणी पायी जावे लागते. 

बुकींग केल्याच्या दोन दिवस आधी भाविकांना गुप्तकाशीमध्ये पोहोचावे लागते. त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर भाविकाला पायी किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने मंदिरात जाता येते. तेथे गेल्यानंतर पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर ध्यानसाधना करण्यासाठी गुहेत जाण्याची परवानगी दिली जाते. गुहेत एका वेळी एकच व्यक्ती राहू शकते, असे या अधिकार्‍याने सांगितले. जर या व्यक्तीला काही अडचण आली, तर ती व्यक्ती फोनवरून सांगू शकते. बुकींग रद्द केल्यास पैसे परत दिले जात नाहीत. गुहेत राहणार्‍या व्यक्तीला पाणी, चहा, जेवण दिले जाते. तसेच आराम करण्यासाठी या ठिकाणी एक छोटीशी खोली बनवण्यात आली आहे, असेही या अधिकार्‍याने सांगितले.