Home शहरे मुंबई मोदी B.A. पास की नापास विचारलं म्हणून RTI कायदाच बदलला- राज ठाकरे

मोदी B.A. पास की नापास विचारलं म्हणून RTI कायदाच बदलला- राज ठाकरे

0

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे. मोदी-शहांना पुन्हा लक्ष करत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. मोदी B.A. पास की नापास विचारलं म्हणून RTI कायदाच बदलला. माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचा पगार सरकारने ठरवायचा, असा कायदा पारित करून घेतला. माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली. मोदींचं नक्की शिक्षण काय आहे ह्याची माहिती माहिती अधिकाराखाली मागवली गेल्यापासून हा कायदाच बदलला आहे. तेव्हापासून ह्या कायद्यावर अंकुश आणायचा निर्णय घेतला गेला, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, निवडणुकीत हार जीत होत असते, पण कोणी फसवत असेल तर कसं चालेल, सगळे फिक्स असेल तर एवढी मेहनत करायची कशाला. दहशतवाद कायदा; सध्याचा कायदा जो पारित करून घेतला आहे, त्यानुसार एका व्यक्तीला दहशतवादी ठरवायचा अधिकार सरकारला म्हणजेच अमित शाह ह्यांना मिळाला. त्यामुळे कोणी एखादं आंदोलन केलं, तर त्याला दहशतवादी ठरवून त्याला अटक करायचे अधिकार ह्या कायद्याने आले. हे सगळं बहुमताच्या जोरावर केलं आहे. 371 मतदारसंघांमध्ये भाजपाने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार केले गेले, पण ह्यावर कोणी बोलायला तयार नाही. राजकीय पक्ष प्रचार करणार, सभा घेणार, पैसे खर्च करणार आणि तरीही जर भाजपा ईव्हीएमच्या जोरावर मतदान हवं तसं फिरवणार असेल तर राजकीय पक्ष कशा निवडणूक लढवणार, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मी मध्यंतरी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधींची भेट घेतली, ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे हे ह्या दोन्ही नेत्यांना सांगितलं. त्यांनी देखील हा धोका मान्य केला. त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्या सोबत आहोत.
महाराष्ट्र भाजपामधील एक वरिष्ठ नेत्याने बाळा नांदगावकरांना सांगितलं की, भाजप सोडून महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार कारण ईव्हीएम मशीन आमच्या ताब्यात आहेत. आज पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. गिरीश महाजन तर सेल्फी घेत होते. आणि हे असं सगळं करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की ते निवडून येणारच आहेत. एक प्रकारचा यांना माज आलाय, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.