‘म्हणायला भाजपविरोधी आघाडी, प्रत्यक्षात काँग्रेसला नामोहरम करण्याचा पवारांचा डाव’

‘म्हणायला भाजपविरोधी आघाडी, प्रत्यक्षात काँग्रेसला नामोहरम करण्याचा पवारांचा डाव’
- Advertisement -

हायलाइट्स:

  • शरद पवारांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या बैठकीवर भाजपची टीका
  • जनाधार नसलेल्या नेत्यांचा प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न
  • काँग्रेसला नामोहरम करण्याचा हा पवारांचा डाव

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत बोलावलेल्याम बैठकीची भाजपनं खिल्ली उडवली आहे. ‘जनाधार गमावलेल्या नेत्यांचा चर्चेत राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. भाजपविरोधात आघाडी असं भासवलं जात असलं तरी प्रत्यक्षात काँग्रेसला नामोहरम करण्याचा पवारांचा हा डाव आहे. अशा प्रयत्नांचा भाजपच्या भक्कम जनाधारावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असं भाजपनं म्हटलं आहे.

शरद पवारांच्या निवासस्थानी आज राष्ट्र मंचाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी पत्रकार परिषद घेऊन संभाव्य आघाडीच्या प्रयत्नांवर तोफ डागली. ‘कितीही शून्ये एकत्र केली तरी त्यातून पूर्णांक तयार होत नाही. नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं भांडारी म्हणाले.

वाचा: भाजप नेत्यांनी सीएमची गाडी अडवली; नार्वेकर म्हणाले, शिवबंधन बांधून टाका!

‘राष्ट्रीय राजकारणात आपलं अस्तित्व दाखविण्याच्या पवारांच्या धडपडीमुळं अगोदर अस्तित्वात असलेली यूपीए आघाडी अधिकच मोडकळीस आली आहे. पहिल्या आघाडीचा अस्त होत असताना त्यातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांचा नव्या आघाडीचा प्रयत्न हे त्यांच्या राजकीय नैराश्याचे प्रतिबिंब आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जनाधाराची थट्टा करून, विश्वासघाताने आघाडी करणाऱ्या पवार यांना राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व दाखविण्याची अखेरची संधी आहे, हेच या धडपडीतून स्पष्ट होते,’ अशी टीका भांडारी यांनी केली.

‘यूपीएचं नेतृत्व करण्याची शरद पवारांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्याचा उच्चार ते आपल्या समर्थकांकरवी वारंवार करत असतात. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील वितुष्ट टोकाला गेले असून नवी आघाडी हा काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं सोनिया गांधी अस्वस्थ आहेत. त्यांची नाराजी नको म्हणून शिवसेनेनं बैठकीला दांडी मारली आहे, असंही भांडारी म्हणाले.

वाचा: अमरनाथ यात्रा रद्द! काँग्रेसचं भाजपला ‘हे’ आव्हान

Source link

- Advertisement -