हायलाइट्स:
- आदर पूनावाला यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी
- मुंबईस्थित वकील दत्ता माने यांची हायकोर्टात याचिका
- पूनावाला यांना धमक्या येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका
अॅड. दत्ता माने यांनी ही याचिका केली आहे. पूनावाला यांची कंपनी सध्या करोनावरील ‘कोविशिल्ड’ या लसीची निर्मिती करत आहे. लसीचा तुटवडा, लसीच्या किंमती आणि पुरवठ्यावरून गेल्या काही दिवसांपासून गोंधळाची परिस्थिती आहे. हा गोंधळ सुरू असतानाच काही दिवसांपूर्वी पूनावाला यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. पूनावाला यांनी स्वत: एका मुलाखतीमध्ये तसा दावा केला होता. ‘काही राज्यांचे उद्योगपती व मुख्यमंत्र्यांकडून या धमक्या येत आहेत. मी खरं बोललो तर माझा शिरच्छेद केला जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. पूनावाला यांच्या या गौप्यस्फोटानंतर खळबळ उडाली होती.
वाचा: डॉक्टरांची मानहानी; हास्यकलाकार सुनील पालविरुद्ध गुन्हा दाखल
या सगळ्या पार्श्वभूमीवर माने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘लस निर्मिती करणाऱ्या कंपनीचा मालकच असुरक्षित असेल तर लस निर्मितीवर दुष्परिणाम होऊ शकतो. आदर पूनावाला जिवाच्या भीतीनं भारताबाहेर गेले असतील तर ही बाब चिंता वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कंपनीची अवस्था कॅप्टनविना वादळात अडकलेल्या जहाजासारखी आहे. जगातील सर्वाधिक लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीला व तिच्या मालकाला संरक्षण मिळायलाच हवं,’ असं माने यांनी याचिकेत म्हटलं आहे.
वाचा: ‘रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिवीरचे प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ नये’
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे माने यांनी ही याचिका केली आहे. भारतातील सध्याचे लसीकरणाचे आकडेही माने यांनी दिले आहेत. अद्याप मोठ्या प्रमाणावर लसीकरण बाकी आहे. लसीकरण रखडल्यास आणि करोना नियंत्रणात न आल्यास भारताला भयंकर परिणाम भोगावे लागतील. पूनावाला यांना सध्या ‘वाय’ दर्जाची सुरक्षा आहे. मात्र, त्यानंतरही भीतीपोटी ते परदेशात गेले असतील तर ही सुरक्षा अपुरी आहे, असा मुद्दाही याचिकेत मांडण्यात आलाय.