Home बातम्या राष्ट्रीय …म्हणून विधानसभा उपाध्यक्षांनी मुलाच्या तोंडात कोंबले नोटांचे बंडल

…म्हणून विधानसभा उपाध्यक्षांनी मुलाच्या तोंडात कोंबले नोटांचे बंडल

हैदराबाद: एका लहान मुलाच्या तोंडात पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल कोंबल्याने  तेलंगाणा विधानसभेचे उपाध्यक्ष टी. पद्मा राव हे अडचणीत आले आहेत. टी. पद्मा राव यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एका कार्यक्रमात ड्रम वाजवत असलेल्या एका मुलाच्या तोंडात नोटांचे बंडल कोंबताना दिसत आहेत. 

हा व्हिडीओ सिकंदराबादमध्ये आयोजित बोनालू उत्सवादरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पद्मा राव हे या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्सवामध्ये एक मुलगा ड्रम वाजवत होता. त्यावेळी राव यांनी पाचशे रुपयांचे एक बंडल खिशातून काढून या मुलाच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सदर मुलाने हे बंडल तोंडातच पकडून ड्रम वाजवणे सुरूच ठेवले. मग राव यांनी शेजारी उभे राहून त्याचे ड्रम वादन पाहिले.

दरम्यान, टी. पद्म राव यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. या कृतीमुळे मुलगा गुदमरला असता. प्रसंगी त्याचा जीवही गेला असता, असा आरोप काही लोकांनी केला आहे. मात्र आपण काहीही चुकीचे केलेले नाही, असे स्पष्टीकरण राव यांनी दिले आहे. ”हा तेलंगाणाच्या संस्कृतीचा एक भाग आहे. मी या मुलाला पैसे देऊन प्रोत्साहित केले आहे. इतकेच नाही तर भारतातील विवाह सोहळ्यांमध्ये देखील ही प्रथा आहे. तो मुलगा ज्याप्रकारे ड्रम वाजवत होता, ते पाहून मी भारावून गेलो. म्हणून मी त्याला बक्षीस दिले,” असे राव म्हणाले. 

 जर मी नोटांचे बंडल जाळले असते किंवा अन्य प्रकारे नष्ट केले असते तर तो गुन्हा ठरला असता. पण कुठल्याही मुलाला बक्षिस देणे हा गुन्हा आहे का? असा सवालही, राव यांनी उपस्थित केला.