Home शहरे मुंबई यंदा आंब्यांचा गोडवा कमीच

यंदा आंब्यांचा गोडवा कमीच

0
यंदा आंब्यांचा गोडवा कमीच

[ad_1]

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : उन्हाळा आणि आंबा हे अतूट नाते असले, तरी यावर्षी मुंबईच्या बाजारात आंब्याचे प्रकार तुलनेने कमी आले आहेत. निवडक प्रकारचे व श्रेणीतील आंबेच बाजारात मिळत आहेत. काही प्रकारचे आंबे यंदा आलेच नसल्याने विविध प्रकारच्या आंब्यांचा गोडवा चाखण्यास उत्सुक असणाऱ्या आंबाप्रेमींची निराशा होत आहे.

मुंबईत सर्वाधिक मागणी हापूस आंब्यांना असते. त्याबरोबर रसाचा आंबा म्हणून बदामी आंब्यालाही मागणी असते. हा आंबा कर्नाटकमधून येतो. यंदा हापूसच्या सोबतीला हा आंबादेखील बाजारात आहेच. पण करोना संकटामुळे आवक घटल्याने तुलनेने हा आंबा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. या जोडीला लालबाग हा कर्नाटकमधीलच आंबादेखील बाजारात असतो. तो मागील महिन्यापर्यंत होता. पण आता जवळपास नाहीसा झाला आहे. दरवर्षी या तीन आंब्यांखेरीज उत्तर प्रदेशचा दशेरी, बिहारमधला लंगडा व सौराष्ट्रातील (गुजरात) केसर आंबादेखील मुंबईच्या बाजारात दिसतो. पण यंदा हे आंबे आलेलेच नाहीत.

दादर भाजी मंडईतील फळ विक्रेते शामकांत गोठेकर यांनी सांगितले की, ‘यंदा करोना संकट अधिक असल्याने हापूस आंब्याची निर्यात फार कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात हापूस दरवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेच ग्राहक अन्य आंब्यांकडे फारसे वळलेले नाहीत. त्यातून राज्याबाहेरून येणाऱ्या बदामीची आवक कमीच आहे. लालबाग आंबा एरव्ही मे महिन्याच्या मध्यापर्यंत बाजारात असतो. यंदा मात्र एप्रिलअखेरीसच या आंब्याची आवक थांबली. तर अन्य आंबे बाजारात आलेलेच नाहीत.’

हापूसच्या जोडीला मुंबईत पायरीदेखील विक्रीला असतो. प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील हा आंबा आत्ता काही प्रमाणात बाजारत दिसू लागला आहे. पण एकूणच हापूस अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याने पायरीला फारशी मागणी नसल्याचे चित्र आहे. तर मे महिन्याच्या मध्यानंतर तोतापुरी आंबा दक्षिण भारतातून मुंबईत येतो. त्याला चांगली मागणी असते. पण यंदा तोदेखील बाजारात येईल की नाही, याबाबत व्यापाऱ्यांना शंका आहे.

[ad_2]

Source link