यवतमाळ, दि. 15 ऑगस्ट (जिमाका) :- : शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून आमचे शासन हे लोकांच्या हितासाठी आणि अगदी शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यवतमाळ जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहण्यासाठी, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती आणि समतोल विकासाला सर्वांच्या सहभागाने गती देण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे ध्वजारोहण करतांना दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमाचे ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
ना. संजय राठोड नागरिकांना संबोधीत करतांना पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत यवतमाळ जिल्हा नेहमीच आघाडीवर राहीला आहे. राष्ट्रीय विचारांनी भारलेल्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींची परंपरा यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांनी हर घर तिरंगा तसेच इतर विविध उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवित देशप्रेमाचे आणि देशभक्तिचे स्फुल्लिंग निर्माण केले, यासाठी सर्वांचे अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. याची तात्काळ दखल शासनातर्फे घेण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात जुलै अखेर पर्यंत पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोविड कालावधीत मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण झाल्यात. सद्यस्थितित कोविडच्या रुग्ण संख्येत हळु हळु वाढ होत आहे. त्यामुळे ज्यांनी अद्यापही लसीची दुसरी मात्रा घेतली नाही त्यानी तात्काळ जवळच्या लसिकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी. केंद्र शासनाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 दिवस मोफत बुस्टर डोज देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी बूस्टर डोजचा लाभ घ्यावा आणि आपले जीवन सुरक्षित करावे असे आवाहन ना. संजय राठोड यांनी केले.
यावेळी बचत भवन येथे भरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील सवतंत्र्यसेनानी यांच्या छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या परिचय पुस्तिकेचे विमोचन ना. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्यातील वीर नारी व वीर माता-पिता यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला तसेच उपस्थितांना तंबाखु मुक्ततेची शपथ देण्यात आली. राळेगाव, मारेगाव व वणी तालुक्यात 125 नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या जिल्हा शोध व बचाव पथकाच्या सदस्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे अधिकारी कर्मचारी यांचा गौरव तसेच आदर्श तलाठी पुरस्काराचे वितरण, आवास योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार ना. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. बाल संरक्षण अधिकारी देवेद्र राजुरकर, तसेच जिल्हा पुरवठा कार्यालयाला आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळाल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांचा सत्कार ना. संजय राठोड यांचे हस्ते याप्रसंगी करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सर्व शासकीय अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
000