Home ताज्या बातम्या यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थीदशेत शिस्त महत्त्वाची : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थीदशेत शिस्त महत्त्वाची : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

0
यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थीदशेत शिस्त महत्त्वाची : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

सटाणा येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत उद्घाटन संपन्न

 नाशिक, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) :  यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थीदशेत शिस्त महत्वाची असून, ती प्रत्येकाने आत्मसात केल्यास निश्चित आयुष्याला उज्ज्वल  दिशा मिळेल, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

आज सटाणा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बोरसे, आदिवासी अपर आयुक्त संदिप गोलाईत,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना, प्रांताधिकारी बबन काकडे, तहसिलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, कार्यकारी अभियंता डी.व्ही. पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, आर. आर. पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, आज 75 विद्यार्थी क्षमता असलेल्या या वसतिगृहाचे उदघाटन  संपन्न झाले आहे. विद्यार्थी शिक्षणासाठी शहराकडे येतात परंतु राहण्याची सोय नसल्यामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होतो. परंतु ज्या ठिकाणी 50 टक्के पेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असेल अशा ठिकाणी नियोजित आराखडा तयार करून मोठ्या क्षमेतेची वसतीगृहे निर्माण केली जातील. यासाठी आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात व भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे योजनाबद्ध कार्यक्रम आखले आहेत. विद्यार्थ्यांना स्वत:च्या आवडीप्रमाणे कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय  यासह इतर क्षेत्रात शिक्षण घेता यावे यासाठी आदिवासी  विभाग कटिबद्ध असल्योच डॉ.  गावित यांनी यावेळी सांगितले.

डॉ.गावित पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने कोणत्या संधी उपलब्ध आहेत याचेही मागदर्शन शालेय शिक्षणासोबतच मिळेल याचीही व्यवस्था केली जाणार आहे. परंतु यासाठी विद्यार्थ्यांची साथही तितकीच महत्वाची आहे. शिकण्याची जिद्द व चिकाटी ही प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवून आपल्यासोबत इतरांनानी शिक्षणासाठी प्रोत्साहित करून सामाजिक जबाबदारी पूर्ण करावी. आज येथे कुस्ती, बॉक्सिंग, विविध खेळ, कला यात प्राविण्य मिळविलेले विद्यार्थीही उपस्थित आहेत ही बाब खुप प्रशंसनीय आहे. अशा खेळाडू विद्यार्थ्यांसाठी 10 किंवा 15 दिवसांचे कॅम्प आयोजन करून त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल. आगामी काळात बालपणापासूनच विद्यार्थ्यांना शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासोबतच  विविध कला, चित्रकला, खेळ, संगीत, वाद्य यांचेही प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने  आदिवासी विकास विभागामार्फत प्रबोधनी निर्माण केल्या जाणार आहेत. आदिवासी विभागाच्या शेतकरी, कामगार, महिला यांच्यासाठी विविध प्रकराच्या योजना आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे. अशी माहितीही डॉ.  गावित यांनी यावेळी दिली.

खेळाडू माजी विद्यार्थ्यांचा झाला सत्कार

यावेळी आदिवासी आश्रमशाळातील खेळ व कला यात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांचा  डॉ.  गावित यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

सुरवातीला  डॉ.  गावित यांच्या हस्ते वसतिगृहाच्या इमारतीच्या कोनशिलेचे आनावरण करण्यात आले त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी   आमदार दिलीप बोरसे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प अधिकारी आर.आर.पाटील यांनी केले. यानंतर सटाणा तालुक्यातील हरणबारी व भिलवाड येथील शासकीय आदिवासी मुलींचे व मुल्हेर येथील शाासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहाचेही उद्घाटन मंत्री डॉ गावित यांच्या हस्ते संपन्न झाले.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपितासेवा पंधरवडा कार्यक्रमास झाला प्रारंभ

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ व देवळा नगरपंचायत येथील आयोजित कार्यक्रमातून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा कार्यक्रमास  आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी आमदार राहुल आहेर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना, तहसिलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी श्री महेश पाटील,पोलिस निरीक्षक श्री समीर बारावकर, गटशिक्षणाधिकारी श्री शिंदे ,विस्तार अधिकारी श्री सुनील पाटील, मुख्याध्यापक शरीफ शेख, मंगरूळ गावच्या सरपंच रेखा ढोमसे यांच्यासह शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांचा वाढदिवस असून तो लोकांची सेवा करण्याच्या माध्यमातून तो साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे. आजचा दिवस वाढदिवस म्हणून साजरा न करता नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न व

सहकार्य करुन सेवा पंधरवड्याच्या स्वरूपात साजरा करावयाचा आहे. शासनाने समाजातील प्रत्येक घटकांसाठी ज्या योजना तयार केल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याची सुरुवात आजपासून होत आहे. शेतकरी, मजूर व वंचित घटक यांच्यापर्यंत  शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी  सर्वांनी या पंधरवड्यात सेवा देण्याचा प्रयत्न करावा. आपल्या देशात विकासाची संसाधने अनेक आहेत. त्या संसाधनांचा उपयोग परिपूर्ण केला तर देश नक्कीच स्वयंपूर्ण होईल. आशा प्रकारचे क्षेत्र निर्माण करायचे आपल्या हातात आहे. आत्मनिर्भरतेने प्रत्येकाने काम करावे हेच पंतप्रधानांचे स्वप्न असल्याचे डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

सेवा पंधरवडा प्रारंभाच्या निमित्ताने वृक्षारोपण, अंगणवाडी केंद्रांना गॅस शेगडी वाटप, सफाई कामगारांना कपडे वाटप, वृद्धांना काठीवाटप  डॉ.  गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय रक्तदान शिबीर, कोविड बुस्टर डोस कॅम्प आयोजनही देवळा नगरपंचायतच्या वतीने करण्यात आले होते.

00000000