बंगळुरु : जर तुमच्याकडे रिकामा वेळ आहे, दिवसभराचं काम आटोपून तुमच्याकडे बराच वेळ शिल्लक राहतोय तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच महत्वाची आहे. अॅमेझॉन या ऑनलाइन स्टोअरसाठी तुम्ही पार्ट टाइम काम करु शकता. या पार्ट टाइममध्ये तुम्ही अॅमेझॉनचं सामान त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहचवू शकता. यासाठी तुम्हाला 120 ते 140 रुपये प्रतितास अॅमेझॉनकडून दिले जातील.
ई-कॉमर्समधील क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन फ्लेक्स सर्व्हिस गुरुवारी लॉन्च केली आहे. या योजनेतंर्गत कॉलेज विद्यार्थी, फूड डिलिव्हर एक्झिक्युटिव्ह, सर्व्हिस सेक्टर स्टाफ कंपनीसाठी सामान डिलिव्हर करण्याचं काम करु शकतात. भारत हा जगातील 7 वा देश आहे ज्याठिकाणी अॅमेझॉननं अशाप्रकारे योजनेची सुरुवात केली आहे. त्यामुळे अॅमेझॉनच्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये सुधारणा होईल. प्रतितास दिल्या जाणाऱ्या या मानधनात इंधनासाठी लागणारा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु या शहरात सर्वात आधी अॅमेझॉन फ्लेक्सची सुरुवात करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात अॅमेझॉनची ही सुविधा देशातील 7 शहरात चालविण्यात येणार आहे. अमेरिकेत अॅमेझॉनच्या फ्लेक्सची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. आतापर्यंत ही सुविधा स्पेन, जपान, सिंगापूर, जर्मनी, ब्रिटेन याठिकाणी उपलब्ध आहे. अॅमेझॉनने जवळपास 1 हजार भागीदारांसोबत ही सुविधा या शहरांमध्ये सुरु केली आहे. अॅमेझॉन फ्लेक्स अॅप डाऊनलोड करण्यासाठी अॅक्टीव केलं आहे. या अॅपमध्ये जाऊन कोणीही व्यक्ती पार्ट-टाइमसाठी अर्ज करु शकतं. अर्जाची पडताळणी केल्यानंतर अॅमेझॉनच्या बाईकवरुन तुम्ही डिलिव्हरी करु शकता. या डिलिव्हरी एक्झिक्युटीव्हला असे सामान दिले जाईल जे सहजरित्या बाईकवरुन नेणं सोपं असेल. अॅमेझॉनने यासाठी अॅपवर एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यामधून तुम्ही याची माहिती घेऊ शकता.