योग हा संपूर्ण जगाचा ठेवा -केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी

योग हा संपूर्ण जगाचा ठेवा  -केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी
- Advertisement -


मुंबई, दि. २१ : योगाचा उगम भारतात झाला असला तरी आज तो संपूर्ण जगाचा ठेवा आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने मांडलेल्या प्रस्तावाला १७५ देशांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारताचा योगाचा संदेश जगभर पोहोचत असून प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी केले.

१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मरिन ड्राईव्ह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘योगा बाय द बे’ कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, खासदार अनुराग ठाकूर यांनीही उपस्थित राहून योगप्रेमींसह सामूहिक योगाभ्यासात सहभाग घेतला.

शायना एन.सी. आणि नाना चुडासमा यांच्या ‘मुंबई माझी लाडकी’, भारतीय तटरक्षक दल, द योगा इन्स्टिट्यूट, जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन, तेरापंथ युवक परिषद-दक्षिण मुंबई आणि गो ग्रीन-मिकी मेहता यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे, असे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘योगा ३६५’ या संदेशाचा उल्लेख करत त्यांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. समुद्रकिनारी योग करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार अनुराग ठाकूर आणि कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजक शायना एन.सी. यांनी मनोगत व्यक्त केले. मरिन ड्राईव्हच्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, योगप्रेमी आणि नागरिक सहभागी झाले होते.

0000



Source link

- Advertisement -