नाट्य क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ मंडळी, संघटना आणि तरुण रंगकर्मी सरकारला वेगवेगळ्या माध्यमांतून विनवणी करत आहेत. पण रंगभूमी काही केल्या सुरू होत नसून आता रंगकर्मींचा संयम सुटत चालला आहे. ‘#रंगभूमी_सुरु_करा’ असा हॅशटॅग वापरून कलाकारांनी सोशल मीडियावर नाट्यगृहं खुली व्हावी म्हणून चळवळ सुरू केली आहे. अभिनय कल्याणच्या अभिजित झुंझारराव या रंगकर्मीनं या चळवळीला सुरुवात केली. केदार शिंदे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे ही चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीत लहान-मोठे असे सगळेच कलाकार सहभागी होत आहेत. एकांकिका करणारे विद्यार्थीसुद्धा आता या चळवळीत सहभागी झाले आहेत.
‘नांदी’ कधी?
परळच्या महर्षी दयानंद कॉलेजच्या गौरव बाहुतलेनं या चळवळीसाठी ‘नांदी’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. एकांकिका करणाऱ्या कलाकारांनी मिळून हा लघुपट तयार केला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ बराच चर्चिला जात आहे. रंगभूमी पुन्हा सुरू व्हावी आणि पुन्हा एकदा नाट्यसृष्टीला भरभराटीचे दिवस यावे यासाठी ही नांदी आहे. कलांश थिएटर या संस्थेनं या चळवळीसाठी ‘गुंता’ आणि ‘बंधमुक्त’ या दोन नाट्य कलाकृती मुक्त व्यासपीठावर सादर करण्याचं ठरवलं आहे. नाटक आणि नाट्यगृह बंद असल्यामुळे नाट्यसृष्टीचं होणारं नुकसान कधीच भरून निघणार नाही आणि त्याचसाठी नाट्यकर्मी ही चळवळ करत आहेत.
नाट्यकर्मी म्हणून नाटकाशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. गेल्या दोन वर्षांत आपली रंगभूमी नीट उभी राहू शकली नाहीय. सरकारला कितीही विनवण्या केल्या तरी काहीच परिणाम होत नाहीय. अशा वेळी शांत का बसावं हा आमच्या पुढे प्रश्न होता आणि त्याच रोषात ही चळवळ उभी राहिली. आतापर्यंत या चळवळीला मोठा पाठिंबा मिळत असून तब्बल १५ हजार पोस्ट #रंगभूमी_सुरू_करा या हॅशटॅगच्या अंतर्गत केल्या आहेत.
– अभिजित झुंझारराव, प्रमुख, अभिनय कल्याण
नाटकाची आणि रंगभूमीची सुरुवात व्हावी यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. #रंगभूमी_सुरू_करा अशा हॅशटॅगची सुरुवात झाली. तसंच आम्ही वेगळ्या प्रकारे याला पाठिंबा दर्शवण्याचं ठरवलं आहे. म्हणून मी ‘नांदी’ ही संकल्पना लिहिली. मला त्यासाठी प्रत्येकानं मदत केली आहे. नाटकांची पुन्हा सुरुवात होणं गरजेचं आहे. ‘नांदी’साठी महर्षी दयानंदचे प्राध्यापक डॉ. गणेश जोशी यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं.
– गौरव बाहुतले, विद्यार्थी, महर्षी दयानंद कॉलेज