नंदीग्राममध्ये अगोदर ममता बॅनर्जी यांच्या विजयाचं वृत्त ‘एएनआय’ दिलं होतं. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना १६२२ मतांनी पराभूत केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. तर अद्याप मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला. अखेर ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याचं जाहीर करण्यात आलंय. ममता बॅनर्जींचा भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याकडून १७३६ मतांनी पराभव झालाय.
मात्र, एकूणच राज्यातील तृणमूलची कामगिरी चांगली उल्लेखनीय आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला १४७ चा आकडा गाठणं गरजेचं होतं. तृणमूल काँग्रेसनं बहुमताचा हा आकडा सहजच पार केलाय. तृणमूल काँग्रेस २१५ जागांवर आघाडीवर आहे तर भाजप ७४ आघाडीवर असल्याचं यावेळेला दिसतंय. लवकरच अंतिम निकालही जाहीर होईल.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातील मोठमोठ्या नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सपा नेते अखिलेश यादव, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्यासहीत अनेक नेत्यांनी दीदींना विजयाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलंय.