Home ताज्या बातम्या रस्ते, फुटपाथवर झाडे लावण्यात येणार नाहीत; दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेचा निर्णय

रस्ते, फुटपाथवर झाडे लावण्यात येणार नाहीत; दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेचा निर्णय

0
रस्ते, फुटपाथवर झाडे लावण्यात येणार नाहीत; दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेचा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पावसाळ्यात झाडे कोसळून दुर्घटना घडतात. जुनी वठलेली झाडे पडून अपघात होतात. त्यामुळे महापालिकेने रस्ते, फुटपाथवर झाडे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी मोकळी मैदाने, उद्याने, टेकड्या या ठिकाणी येत्या वर्षभरात २५ हजार झाडे लावली जाणार आहेत. जमिनीमध्ये खोलवर मुळे घट्ट पकडून ठेवणाऱ्या देशी वाणांचे वृक्ष मुंबईमध्ये लावण्यावर यावर्षी अधिक भर देण्यात येणार आहे.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते भायखळा येथील महापौर निवासस्थानी शनिवारी वृक्षारोपण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी महापौरांनी पत्रकारांना ही माहिती दिली. झाडे, पशु-पक्षी ही नैसर्गिक साखळी टिकवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे आवश्यक आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.

रस्ते, फुटपाथवर झाडे न लावता पालिका कार्यक्षेत्रातील मोकळी मैदाने, उद्याने व टेकड्या याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे विविध प्रकारच्या जीवघेण्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यावरणस्नेही वातावरण निर्मिती करणे, वृक्षारोपण जतन व संवर्धनाचे काम आवश्यक असल्याचे महापौर म्हणाल्या.

चक्रीवादळामुळे मुंबईतील विविध भागांत झाडे कोसळली आहेत. या हानीची नोंद घेऊन या ठिकाणी देशी वाणांचे वृक्ष यावर्षी मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले. पालिकेच्या उद्यान विभागातर्फे वृक्षारोपणाचा संपूर्ण कार्यक्रम तयार करण्यात आला असून, त्यापद्धतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

१,०६८ भूखंडांवर झाडे

येत्या वर्षात मुंबईतील २४ विभागांत १,०६८ भूखंडावरील २२९ उद्याने, ४३२ मैदाने, ३१८ मनोरंजन मैदाने;तसेच इतर ८९ ठिकाणी २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

‘मियावाकी’ची साडेतीन लाख झाडे

मुंबईत अधिकाधिक हिरवळ निर्माण करण्यासाठी मियावाकी पद्धतीची झाडे लावली जात आहेत. एकूण तीन लाख ६४ हजार ८१६ झाडे लावण्याचे प्रस्तावित असून, त्यापैकी आजपर्यंत दोन लाख २१ हजार ४०५ झाडे लावण्यात आली आहेत.

सन २०१९च्या वृक्षगणनेनुसार…

२९ लाख ७५ हजार २८३

मुंबईत एकूण झाडे

१ लाख ८५ हजार ३३३

रस्त्यालगतची झाडे

१ लाख एक हजार ६७

उद्यानांमधील झाडे

११ लाख २५ हजार १८२

शासकीय परिसरातील झाडे

१५ लाख ६३ हजार ७०१

खासगी आवारातील झाडे

Source link