Home बातम्या रस्त्याची कामे रेंगाळली, उरण शहरात पाणी तुंबणार

रस्त्याची कामे रेंगाळली, उरण शहरात पाणी तुंबणार

न्हावाशेवा:

उरण नगर पालिकेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे सध्या तरी शहरातील अनेक भागातील विकास कामे रेंगाळत पडली आहेत. एकंदरीत रेंगाळत पडलेल्या विकास कामामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया सध्या जनमानसात उमटत आहे. उरण न्यायालय परिसर पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याने न्यायालयाने देखिल या कामांबाबत नाराजी व्यक्त केली असून खबरदारी घेण्याच्या सुचना नगरपरिषदेला केल्या आहेत.

उरण नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी उरण शहराच्या नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करुन देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.परंतु शहरातील विविध भागात सुरू असलेल्या विकास कामांकडे नगर पालिकेतील सत्ताधारी,विरोधक आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याने आज अनेक प्रभागातील विकास कामे रेंगाळत पडली आहेत.

एकंदरीत रेंगाळत पडलेल्या विकास कामामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी तुंबल्याचा धोका निर्माण झाला आहे.तसेच झाकण नसलेल्या उघड्या गटारात पादचारी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.तरी रेंगाळत पडलेल्या विकास कामांकडे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे यांनी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरीक, पादचारी करीत आहेत.

उरण नगर पालिकेचे मुख्याधिकारी अवधुत तावडे यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की उरण शहरात सध्या रस्त्यांची,गटारांची,नाले सफाईची कामे सुरू आहेत.पावसाळ्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्यासंदर्भात न्यायालयाकडून पत्र ही आले आहे.एकंदरीत शहरात पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी उरण नगर पालिका लक्ष देऊन काम करीत आहे.