Home शहरे सांगली रस्त्याच्या वादातून चुलत भावाचा निर्घृण खून

रस्त्याच्या वादातून चुलत भावाचा निर्घृण खून

जत/उमदी : सुसलाद (ता. जत) येथील बसवंतराया ऊर्फ निंगप्पा रावसाप्पा बन्नी (वय ५५) यांचा शेतजमीन वादातून कुºहाड, काठी व लोखंडी गजाने बेदम मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी चार वाजण्याच्या दरम्यान सुसलाद गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या बन्नी वस्ती येथे घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुसलाद येथील निंगप्पा बन्नी यांचे सख्खे चुलत भाऊ कांतापा मल्लाप्पा बन्नी, मुदका मल्लाप्पा बन्नी व राजू मल्लाप्पा बन्नी यांच्यात शेतातून जाणाऱ्या रस्त्यासाठी गेल्या १० ते १५ वर्षांपासून वाद होता. हा वाद मिटविण्यासाठी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी प्रयत्न केले होते; परंतु वाद मिटला नाही.
रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान पुन्हा याच कारणातून त्यांच्यात वाद झाला. या वादातून मारहाण सुरू झाली. कांतापा बन्नी, मुदका बन्नी, राजू बन्नी, रावतू मल्लाप्पा बन्नी व विठाबाई कांताप्पा बन्नी यांनी मिळून निंगप्पा बन्नी यांना काठीने मारहाण केली व ते निघून गेले. जवळच असणारे निंगप्पा यांच्या घरचे व आसपासचे लोक तेथे आले. ते त्यांना जत येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत निंगप्पा यांचा मुलगा आमसिद्धा यांनी सातजणांविरोधात रात्री उशिरा उमदी पोलिसांत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. संशयित सात आरोपींमध्ये चार पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. मारहाण करणारे हे मृताचे चुलत भाऊ व पुतणे आहेत.
जागेच्या वादाबाबत संख अप्पर तहसील कार्यालयात अपील करण्यात आले होते. हे प्रकरण मागील एक वर्षापासून न्यायप्रवीष्ट असताना संशयित आरोपी हे शेतजमिनीत घर बांधण्याचे काम करत होत. या बांधकामाला निंगप्पा बन्नी यांनी विरोध केला होता. निंगप्पा यांच्या मुलाने शनिवारी उमदी पोलिसांत तक्रारही दिली होती. परंतु पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याकडे दुर्लक्ष केले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर ही घटना घडलीच नसती, अशी चर्चा येथे सुरू आहे.

कुटुंब हादरले
मृत निंगप्पा बन्नी यांना दोन मुले व दोन मुली आहेत. पत्नी व चार मुलांसमवेत ते मळ्यातील घरात राहत होते. या घटनेने हे कुटुंब हादरून गेले आहे.