'रागोपनिषद'द्वारे शास्त्रीय संगीताचे जतन, संवर्धन -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'रागोपनिषद'द्वारे शास्त्रीय संगीताचे जतन, संवर्धन -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Advertisement -

मुंबई. दि.8 :- भारतीय शास्त्रीय संगीतात अद्भुत शक्ती असून याची अनुभूती आपण वेळोवेळी घेतो. हा संपन्न सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला असून रागोपनिषद या ग्रंथाद्वारे भारतीय शास्त्रीय संगीताचे जतन व संवर्धन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

गोरेगाव येथील लक्ष्मी सरस्वती मैदान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते संवादिनीचे सूर छेडून रागोपनिषद या ग्रंथाचे आणि म्युझिक अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, गुजरातचे गृहमंत्री हर्षद भाई सांगवी,आमदार पराग अळवणी, विद्या ठाकूर, गच्छाधिपती कल्पतरू सूरी महाराज, तीर्थभद्र सूरी महाराज, पन्यास तीर्थ रुची महाराज, पन्यास कल्पजीत महाराज, तीर्थ रतीजी महाराज,  जिग्नेश दोशी, किरीट भन्साळी,  सनी पंड्या, पृथ्वीराज कोठारी,विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, पं. भरत बलवल्ली, पं. आनंद भाटे, व मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,सामवेद हा आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा मुलाधार आहे. असा संपन्न सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत तेजस्वी आहे. ते मनाला सुखावणारे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच अनेक व्याधी दूर करण्यासाठीही भारतीय शास्त्रीय संगीत उपयुक्त ठरते हे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे. दीर्घ संशोधनातून रागोपनिषद हा ग्रंथ साकारला असून विलुप्त होत असलेल्या रागांचे पुनरुज्जीवनच यानिमित्ताने करण्यात आले आहे हे नक्कीच अभिनंदनीय आहे.

देशातील नामवंत गायकांनी यामधील रचना गायल्या आहेत हे  वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात यमन कल्याण हा राग अतिशय प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच आम्ही देखील नेहमी जनकल्याणाचाच राग आळवतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आचार्य तीर्थभद्र सूरी महाराज म्हणाले, भारतीय शास्त्रीय संगीताचा अनमोल ठेवा आपल्याला लाभला आहे. अनेक व्याधी दूर करण्यासाठी शास्त्रीय संगीताच्या श्रवणाचा लाभ होतो हेही आपण जाणतो. रागोपनिषद हा ग्रंथ दीर्घ संशोधनातून साकारला असून देशातील नामवंत संगीत शिक्षण संस्था आपल्या अभ्यासक्रमात या ग्रंथाचा समावेश करणार आहेत हे नक्कीच अभिमानास्पद आहे.

- Advertisement -