Home ताज्या बातम्या राजगुरूनगरातील ६ व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

राजगुरूनगरातील ६ व्यक्तींचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

राजगुरूनगर: राक्षेवाडीत करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या राजगुरूनगर शहरातील ६ व्यक्तींचा करोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली. राजगुरूनगर नगर शहरात पसरलेली घबराट आणि अफवा आता थांबणार आहेत.

राजगुरुनगर शहराच्या लगत असलेल्या राक्षेवाडीतील एका इमारतीमधील एका व्यक्तीला करोना झाला आहे.त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील इतर चार व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आल्याने राजगुरूनगर शहर भीतीने हादरले होते. करोना बाधित महिला व्यक्तीच्या कंपनीत काम करणाऱ्या व जवळून संपर्क आलेल्या ६ महिला राजगुरूनगर व राजगुरूनगर शहरालगत राहणाऱ्या होत्या. त्यांना तपासणीसाठी खेड आरोग्य विभागाने दोन दिवसापूर्वी पुणे येथे पाठविण्यात आले होते. या सर्वांची स्वब टेस्ट घेण्यात आली आज त्यांच्या रिपोर्ट प्राप्त झाला. यात या सर्व ६ व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.

राक्षेवाडी मधील करोना बाधित व्यक्तिंच्या 2 मुलांचे रिपोर्ट येणे अद्यापही बाकी आहेत.
राक्षेवाडीतील करोना बाधित महिलेच्या कंपनीत काम करणाऱ्या ६ व्यक्ती राजगुरूनगर शहरातील विविध भागात राहणाऱ्या असून त्या जास्त संपर्कात होत्या. त्यामुळे संपूर्ण राजगुरूनगर शहर चार दिवस करोना भीतीच्या दबावाखाली होते. शासकीय यंत्रणाही या व्यक्तींच्या रिपोर्ट कडे लक्ष ठेवून होती.आज(दि.१९) सकाळी या सहा व्यक्तींचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्याने प्रशासनासह नागरिकानी सुटकेचा श्वास सोडला.

दरम्यान या 6 व्यक्तीना आरोग्य विभागाने तपासणीसाठी नेल्याने शहरात मोठ्या अफवा आणि खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर मोठ्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठी धडकी भरली होती. याबाबत खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले की, करोनावर मात करण्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे.

नागरिकानी अफवांवर विश्वास ठेवू नये. शासकीय माहिती आल्याशिवाय सोशल मीडियावर चर्चा अफवा पसरू नये. शहरातील 6 जणांची करोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याने शहारावरचे मोठे संकट टळले आहे.तरीही नागरिकांनी स्वतःची कुटुंबाची काळजी घ्यावी, शासकीय सूचना व नियमांचे कडक पालन करावे. विनाकारण सोशल मीडियावरून अफवा पसरू नयेत.