
मुंबई दि. 22 : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व योगदानाचा गौरव करण्यासाठी मौजे चौंडी येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथे झाला. त्यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधून त्यांचा गौरवशाली जीवनपट व धनगर समाजाची परंपरा, इतिहास, संस्कृती आणि जीवनशैली आगामी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता वाशिम जिल्ह्यातील बंजारा विरासत स्मारकाच्या धर्तीवर मौजे चोंडी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे. या स्मारकासाठी ५०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असेही क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री.भरणे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
धनगर समाज अनेक वर्षापासून या देशात अस्तित्वात असलेला श्रमशील व संस्कृतीने समृद्ध असलेला वर्ग आहे. शेती, पशुपालन आणि लोकजीवनातील योगदानाबरोबरच अनेक समाजसुधारक, योद्धे, संत, गायक, कलाकार या समाजातून उदयास आले आहेत. धनगर संस्कृतीचे वैभव, पोशाख, वेशभूषा, बोलीभाषा, लोककला, संगीत, धार्मिक परंपरा आणि जीवनपद्धतीची समृद्ध परंपरा आहे. हे स्मारक केवळ एक सांस्कृतिक स्मारक न राहता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा गौरवशाली इतिहास, धनगर समाजाच्या परंपरा, जीवनशैली, लोककला, साहित्य, संगीत आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे दस्तावेज जतन करणारे वैभवशाली इतिहासाचे प्रतीक ठरले, असा विश्वासही क्रीडा व युवक कल्याणमंत्री यांनी व्यक्त केला.
०००