
अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली. यावेळी राज्यपाल यांनी अनाथ आश्रमाला भेटवस्तू दिल्या. तसेच बुरघाट येथील निवासी शाळेला भेट दिली.
वझ्झर बालगृहात राहून मोठ्या झालेल्या आणि आता लग्न झालेल्या मतिमंद, मूकबधिरांना राज्यपालांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर, आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अतिरिक्त आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, राजभवनचे नियंत्रक जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, तहसीलदार संजय गरकल, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर, अनिल गडेकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी बालगृहातील मुलांची भेट घेवून विचारपूस केली. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या माला पापळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री. पापळकर यांनी बेवारस मतिमंद मुलांच्या कायम पुनर्वसनाची मागणी केली. तसेच अनाथश्रमातील 12 मुलामुली शासकीय नोकरी करीत आहे. तसेच आश्रमात १२३ विकलांग मुले आहेत. त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालगृहात राहता येत नाही. तथापि, हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी, प्रत्येक मागणीबाबत सकारात्मक मदत करण्यात येईल. बेवारस, मतिमंद व मुकबधिर मुलांचे प्रश्न जाणून घेवून पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी पालकत्व स्वीकारले आहे. श्री. पापळकर यांच्या मागणी आणि मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जातीने लक्ष दिले जाईल. बेवारस, मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी शंकरबाबा पापळकरांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे. या क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. पद्मश्री पुरस्काराचा सन्मान हा सर्व मुलीमुलींचा आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्यांचा असल्याचे सांगितले.
यावेळी पद्मावती व दिलीप ढगे, बेबी व बल्लम पापळकर, वैशाली आणि अनिल पापळकर, शोभा आणि अमित पापळकर, सुशीला आणि अशोक देशमुख, शैलजा आणि राजेंद्र फुले यांना भेटवस्तू आणि ‘गीता’ ग्रंथ भेट देण्यात आला. तसेच सलमा आणि सईद खान यांना भेटवस्तू आणि ‘कुराण’ ग्रंथ भेट देण्यात आला. आश्रमातील गांधारी हिने स्वागतगीत सादर केले.
त्यानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी या अनाथाश्रमातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा, बुरडघाट येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मुलींशी संवाद साधला.
000000