मुंबई, दि. 21 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा पारंपरिक नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर केला.
मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्यांनी आपल्या स्थापनेपासून शिक्षण, आरोग्य व पर्यटन या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. गेल्या दहा वर्षांमध्ये उत्तर पूर्वेतील राज्ये रेल्वे, रस्ते तसेच हवाई मार्गाने संपूर्ण देशाशी जोडले गेले आहेत.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांची भाषा, लोककला, जीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तिन्ही राज्यांच्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.हेमलता बागला, कुलसचिव डॉ. भगवान बालानी, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, एचएसएनसी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविक केले तर परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी आभारप्रदर्शन केले.’