
मुंबई, दि.२६ : सर्व धर्म-पंथातील लोकांसाठी खुल्या असणाऱ्या आणि देश, भाषा, धर्म, वर्ण यांच्या पलिकडे जाऊन कार्य करणाऱ्या यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएसन (वायएमसीए) या धर्मनिरपेक्ष संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. आपल्या दीडशे वर्षांच्या प्रवासात या संस्थने चारित्र्यसंपन्न नागरिक, नैपूण्यपूर्ण खेळाडू आणि सामाजिक जाणिवा असलेली व्यक्तिमत्त्वे घडविली, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले.
राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वायएमसीए’ या संस्थेचा 150 वा वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (25 एप्रिल) एनसीपीए सभागृह मुंबई येथे पार पडला. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय महासचिव एन. व्ही. एल्डो, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती आणि बॉम्बे वायएमसीएचे सदस्य, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले, वायएमसीए हॉस्टेलच्या माध्यमातून निवास व भोजनाची सुविधा निर्माण करुन दिल्यामुळे व्यापारी-उद्योजकांच्या जीवनात या संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. ‘वायएमसीए’ने गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तसेच क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे कार्य यापुढेही सुरु ठेवावे. मुंबईच्या लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात ‘वायएमसीए’ने देखील आपले कार्यक्षेत्र आणि सेवा वाढवणे गरजेचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी बॉम्बे वायएमसीएच्या ‘हाऊ मच कॅन वी डू फॉर अदर्स’ या कॉफीटेबल पुस्तकाचे तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
0 0 0