मुंबई, दि. 11 : छोट्या मोठ्या चुकांमुळे कैदी बनून आयुष्य जगणाऱ्या अनेकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला… निमित्त होते, ‘जीवनगाणे गातच जावे’… या अनोख्या कार्यक्रमाचे… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, राज्यातील 36 प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आज आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला.
‘जीवन गाणे गातच जावे…’ या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात आयोजन होण्याची ही घटना, देशाच्या व राज्याच्या इतिहासात प्रथमच घडली. व्यावसायिक कलाकारांसोबतच, कारागृहातील कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केले हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य!
राज्यात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. या महोत्सवात अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणजे राज्यातील प्रमुख कारागृहात सांस्कृतिक, समुपदेशनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली बिभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या कार्यक्रमासाठी एकूण 36 कला समूह निवडण्यात आले होते. एक महिन्यापासून या कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गृह विभागाच्या मदतीने सूक्ष्म नियोजन केले होते. या कार्यक्रमांत 1000 हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. बहुतांश कार्यक्रमासाठी संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, न्यायाधीश उपस्थित होते. कारागृहातील कैद्यांसाठी झालेल्या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, प्रबोधन, समुपदेशन, योग क्रिया याबरोबरच इतर कार्यक्रम ही आयोजित केले होते.
कारागृहातील कैद्यांचे उत्कृष्ट सादरीकरण
‘जीवन गाणे गातच जावे…’ या कार्यक्रमात कारागृहातील अनेक कैद्यांनी सादरीकरणात सहभाग घेतला. काही कैद्यांनी अप्रतिम वादन, गायन, काव्यवाचन आणि नृत्य करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला. कैद्यांमधील कलाकार पाहण्याची दुर्मिळ संधी यावेळेस सर्वांना मिळाली. अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार करावे, अशी अपेक्षाही अनेकांनी केली. जाणते आजाणतेपणाने झालेल्या चुकांमुळे, शिक्षा भोगावी लागत असल्याचे काही कैद्यांनी स्पष्ट केले. मात्र आजच्या कार्यक्रमामुळे नवी दिशा मिळाली असून, भावी आयुष्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, अशी आशाही अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे शीर्षक “जीवन गाणे गातच जावे..”, यामुळे ही एक नवी ऊर्जा मिळाली असून, जीवनात नवा अध्याय सुरू करणार असल्याची भावनाही काही कैद्यांनी बोलून दाखवली.
राज्याच्या गृहविभागाचे सहकार्य
राज्याच्या गृह विभागाने या उपक्रमासाठी सर्व सहकार्य केले. तुरुंग प्रशासन आणि गृह विभाग यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे कार्यक्रम होऊ शकले. राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुरुंग प्रशासनाला आदेश देऊन सहकार्य करण्याबाबत कळविले होते. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा पुणे, सुनील रामानंद यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. हेमंत पवार संशोधन अधिकारी, कारागृह व सुधार सेवा यांनी याबाबत योग्य तो समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
कलाकारांच्या प्रतिक्रिया
कारागृहातील कैद्यांसाठी कार्यक्रम करणे हे कलाकारांसाठी आव्हान होते व हा एक वेगळा अनुभव होता असे अनेक कलाकारांनी नमूद केले. या कार्यक्रमांमधून मनोरंजन व प्रबोधन करण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक कलाकारांनी शासनाचे आभार मानले.
कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी, असे कार्यक्रम कारागृहात प्रथमच होत असल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करून आभार मानले. तसेच असे कार्यक्रम वारंवार आयोजित करावेत जेणेकरून कैद्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन होऊ शकेल आणि त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वादही घेता येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या धर्तीवरच पुढील महिन्यात राज्यातील 36 जिल्ह्यातील वृद्धाश्रमांतही अशाच प्रकारचे कार्यक्रम होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक यांनी स्पष्ट केले आहे.
भायखळा जिल्हा करागृह येथे महिला बंद्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या याकार्यक्रमाच्या वेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्री. संदीप शेंडे व कारागृह अधीक्षक श्री. यशवंत भानुदास फड यांनी बंद्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. ए. टी. पाटील, वरिष्ठ तुरुंगाधिकारी यांनी आभार मानले.