मुंबई, दि. 13 : राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख, प्रभावी आणि समन्वयपूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठका राज्यभर सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होत असून स्थानिक स्तरावरील आरोग्यविषयक प्रश्नांच्या प्रभावी निराकरणाला चालना मिळत आहे.
13 जून 2026 पर्यंत राज्यातील 25 जिल्ह्यांमधील विधानसभा स्तरावरील समित्यांपैकी 4 समित्यांच्या बैठका पार पडल्या असून 21 समित्यांच्या बैठका नियोजित आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे बैठका यशस्वीपणे पार पडल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे समितीची बैठक 13 जून रोजी आयोजित करण्यात आली.
याशिवाय पेण, विक्रमगड, नांदगाव, मालेगाव (आऊटर), बागलाण, कळवण, दिंडोरी, राधानगरी, कागल, शाहुवाडी, इचलकरंजी, दापोली, बसमत, अकोट, बाळापूर आणि आरमोरी या मतदारसंघांमध्ये बैठकींच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू असल्याने तेथील बैठका पुढे आयोजित करण्यात येणार आहेत.
नियमित आढावा आणि प्रभावी समन्वय
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालकमंत्री तसेच विधानसभा सदस्यांना समिती स्थापनेसंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याचे काम सुरू असून बैठकींच्या आयोजनासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्यस्तरावर गुगल शीट, दूरध्वनी संपर्क आणि जिल्हास्तरीय समन्वय यंत्रणेच्या माध्यमातून समित्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्यात येत आहे.
आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ
एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्यांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे:
– आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता सुधारणे
– राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी
– विविध विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित करणे
– आरोग्यविषयक स्थानिक समस्यांचे त्वरित निराकरण
– समुदाय सहभाग वाढविणे
– आरोग्य संस्थांचा गुणात्मक दर्जा उंचावणे
– नागरिकांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे
चार स्तरांवरील समिती रचना
राज्यातील आरोग्य व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी समित्यांची बहुस्तरीय रचना करण्यात आली आहे.यामध्ये ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, महानगरपालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघ, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती आहेत. या समित्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य अधिकारी आणि नागरिक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद घडून येणार असून आरोग्य सेवांमध्ये उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि परिणामकारकता वाढण्यास मदत होणार आहे.
लोकसहभागातून निरोगी महाराष्ट्र
आरोग्य सेवा केवळ उपचारापुरती मर्यादित न ठेवता लोकसहभाग, स्थानिक नेतृत्व आणि समन्वयाच्या माध्यमातून अधिक प्रभावी बनविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्या या प्रयत्नांना संस्थात्मक स्वरूप देत असून “निरोगी महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र” या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. आरोग्य सेवांबाबतच्या स्थानिक गरजा, अडचणी आणि अपेक्षा यांचा थेट आढावा घेऊन त्वरित उपाययोजना करण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरत असून राज्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख आणि उत्तरदायी बनविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.






















WhatsApp