Home बातम्या आंतरराष्ट्रीय राज्याकडूनही पतंजलीला दणका; Coronil ला दिला खोकला-तापाच्या औषधाचा परवाना

राज्याकडूनही पतंजलीला दणका; Coronil ला दिला खोकला-तापाच्या औषधाचा परवाना

डेहराडून : कोरोनावर प्रभावी औषध आणल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीच्या समस्येत आता अधिक वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या नोटीसीनंतर आता उत्तराखंड सरकारकडूनही दिव्य योग फार्मेसीला नोटीस बजावण्यात आली आहे. खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता, कोरोनाचं औषध बनवण्यासाठी परवानगी मिळाली कशी?, अशी विचारणा पतंजलीला राज्याच्या आयुर्वेद विभागाकडून करण्यात आली आहे.

राज्याच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजलीला इम्युनिटी बुस्टर, सर्दी-खोकला तापाच्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता. त्यात कोरोनाव्हायरसचा उल्लेख नव्हता.

उत्तराखंडच्या आयुर्वेदिक विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पतंजलीने आमच्याकडे अर्ज दिला होता, त्यानुसार आम्ही त्यांना परवाना दिला. मात्र त्यांनी कोरोनाव्हायरसचा उल्लेख केला नव्हता. आम्ही इम्युनिटी बुस्टर, सर्दी-खोकला आणि तापाच्या औषधासाठी परवाना मंजूर केला होता. त्यांना कोरोना किट बनवण्यासाठी परवानगी कशी मिळाली, याबाबत आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे.

दिव्य योग फार्मसीने कोरोनाचं जे औषध तयार केल्याचा दावा केला आहे, त्याचा आधार आहे? कोरोना किट तयार करण्यासाठी कुणाची परवानगी घेतली, औषधाच्या प्रचारासाठी फार्मसीने परवानगी का नाही घेतली? असे प्रश्न विचारण्यात आलेत. कुणीही असा चमत्कारी उपचाराचा दावा करू शकत नाही. मग रामदेव बाबांनी कशाच्या आधारावर कोरोना 100% बरा होत असल्याचा दावा केला आहे? फार्मसीने औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायदा-1940 मधील कलम-170 चं उल्लंघन केलं आहे, असं औषध नियंत्रण विभागाने म्हटलं आहे.

जर फार्मसीने नोटिसीला सकारात्मक उत्तर दिलं नाही तर इम्युनिटी बुस्टर औषधांसाठी त्यांना जो परवाना देण्याक आला आहे, तोदेखील रद्द केला जाईल, असं औषध नियंत्रक अधिकारी यतेंद्र सिंह रावत यांनी सांगितलं.