राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
- Advertisement -

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरांप्रती कृतज्ञ राहणं प्रत्येकाचं कर्तव्य

कोल्हापूर, दि.15 (जिमाका) : कोल्हापूर जिल्हा प्राचीन परंपरेच्या खुणा अभिमानानं मिरविणारा मात्र आधुनिक विचारांचा आदर्श जिल्हा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडविलेल्या ऐतिहासिक, अध्यात्मिक, सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांसह प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देऊन जिल्ह्यातील दुधगंगा धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच क्रीडा विषयक माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच देशाच्या संरक्षणासाठी प्राणाचं बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिक, वीरांना, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या महाराष्ट्रवीरांना व त्यांच्या कुटुंबियांना वंदन करुन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या, महाराणी ताराबाईंच्या त्याग, शौर्य, कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या, सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर नगरीत स्वातंत्र्य दिनी ध्वरारोहण करण्याचा मान मिळाला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.

स्वातंत्र्य वीरांच्या त्यागातून, बलिदानातून देशाला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. तसेच सैन्यदल, निमलष्करी दल, पोलिस, सर्वसामान्य नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली आहे. अनेक कठीण परिस्थितीला सामोरं जात 76 वर्षे हे स्वातंत्र्य आपण टिकवलं आणि सुरक्षित केलं आहे. यापुढेही देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आपण सर्वांनी मिळून टिकवणं महत्त्वाचं आहे. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली, याचं श्रेय देशातल्या नागरिकांचे व त्यांच्या लोकशाहीवरच्या विश्वासाचे आहे.

देशानं गेल्या 76 वर्षात खूप प्रगती केली. या प्रगतीचं श्रेयं, देशातल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातल्या नेतृत्वानं जी मेहनत घेतली, त्या मेहनतीला आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्ती, संस्था, संघटनेनं देशाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानामुळं आपण इथपर्यंत पोहचलो आहोत.  देशासह राज्यात कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं, निर्धारानं लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना त्यांनी धन्यवाद दिले. विविधतेत एकता ही आपल्या भारत देशाची खरी ओळख आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातल्या ‘टॉप 10’ अर्थव्यवस्थांमधून ‘टॉप-5’वर पोहोचली आहे. भारताचा ‘जीडीपी’ दर सहा ते सात टक्यांच्या सध्याच्या सरासरीने वाढत राहिला तर लवकरच आपण जर्मनी आणि जपानला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. प्रत्येक भारतीयाच्या परिश्रम आणि योगदानाच्या जोरावर हा टप्पा आपण निश्चित गाठू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम’ या संकल्पनेवर यावर्षी आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. यानुसार देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना वंदन करण्यासाठी देशात ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’, ग्रामसभा, पंचप्रण प्रतिज्ञा, शिलाफलक अनावरण, वृक्षारोपण, वीरांना वंदन असे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.


राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरीकांच्या कल्याणाच्या अनेक योजनांसाठी 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी 4 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यात केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारकडूनही 500 रुपये प्रती महिना देण्यात येणार आहेत. तसेच राज्यात सर्वसमावेशक विमा योजनेनुसार अवघ्या एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येत आहे. याचा लाभ राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात वेळेत कर्ज परतफेड करण्यात आणि वेळेत वीज बिल भरण्यामध्येही कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याबद्दल कोल्हापूरकरांचे कौतुक करुन नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.  कोणत्याही शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे आवश्यक असून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न सर्वांनी मिळून समन्वयाने सोडवावा, असे आवाहन त्यांनी केले.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपयांवरुन दीड हजार रुपये अनुदान करण्यात आले आहे. या याजनेतल्या लाभार्थ्यांना वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना राज्यात 700 ठिकाणी सुरु केली आहे. या माध्यमातून 7 लाख 43 हजार 570 रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकत्रित करून आता सर्वांनाच पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या मानधनातही भरीव वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवासात सरसकट 50 टक्के, 65 ते 75 वर्षामधील लोकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी अभियान राज्यभर यशस्वीपणे राबविण्यात आले. यामुळे सामान्य नागरिकांचे श्रम, पैसा आणि वेळेची बचत होऊन गरजू लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचत आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाद्वारे रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय राजमार्ग क्र.166 वरील ‘आंबा ते पैजारवाडी’, ‘पैजारवाडी ते चोकाक’ पर्यंतच्या चौपदरीकरणासह अन्य मार्गांचेही काम सुरु असल्याचे सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शहीद जवानांचे बलिदान व अपंगत्व प्राप्त सैनिकांप्रति उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी त्यांच्या हस्ते वीरपत्नी श्रीमती पद्मा प्रशांत जाधव व अपंग सेवारत सैनिक अक्षय नंदकुमार केंगरे यांना ताम्रपट वितरण करण्यात आले.

जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये सन 2019-20 साठी अश्विनी मळगे- वेटलिफ्टींगमध्ये तर कु. आरती पाटील- बॅडमिंटन दिव्यांग खेळाडू. सन 2020-21 साठी कु. सोनल सावंत- पॉवरलिफ्टींग, कु. स्वाती शिंदे- कुस्ती, कु. अभिज्ञा पाटील- नेमबाजी, श्रीमती स्वप्नाली वायदंडे – सॉफ्टबॉल तर दिपक पाटील यांना जलतरण दिव्यांग खेळाडू म्हणून पुरस्कार वितरण करण्यात आला.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना उत्तम जीवरक्षक पदकाने गौरवण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा कारागृह (शहर) सन 2022-23 साठी प्रशंसनीय सेवेबद्दल कारागृह विभागाचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र घोषित करण्यात आले. यामध्ये तुरुंगाधिकारी चंद्रशेखर देवकर, सुभेदार रुपेंद्र कुंभार, कारागृह शिपाई रुपेंद्र कोळी, इजाज शेख, श्रीधर कुंभार विद्या ढेंबरे यांना गौरवण्यात आले.
एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सी.पी.आर. रुग्णालय व गंगा प्रकाश हॉस्पिटल या रुग्णालयांना तसेच विभागीय व्यवस्थापक किरण कुंडलकर, जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोलकुंबे व डॉ. रेणुका वेदुलेकर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्ह्यात मधाचे गाव, मधमाशी मित्र, रेशीम ग्राम व स्टार्टअप यात्रा यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांना गौरविण्यात आले.

शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. इयत्ता 5 वी ग्रामीण विभागामध्ये आजरा तालुक्यातील वि.मं.सुळगाव शाळेचा विद्यार्थी बुशरा मुल्ला, राधानगरी तालुक्यातील केंद्र शाळा गुडाळचा विद्यार्थी विराजराजे मोहिते. इयत्ता 5 वी शहरी विभागामध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी पूर्वा भालेकर तर लक्ष्मीबाई जरग विद्यालयातील विद्यार्थिनी शौर्या पाटील. इयत्ता 8 वी ग्रामीण विभागातील भुदरगड तालुक्यातील प.बा.पाटील हायस्कूल, मुदाळचा विद्यार्थी पार्थ पांडूरंग पाटील, संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथील विद्यार्थी चैतन्य धोनुक्षे. इयत्ता 8 वी शहरी विभागातील म.न.पा. इचलकरंजीमधील तात्यासो मुसळे विद्यालय येथील विद्यार्थिनी श्रध्दा कामते व डी.के.टी.ई हायस्कूलमधील विद्यार्थिनी आर्या कामीरे यांना गौरविण्यात आले.

0000

- Advertisement -