राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
- Advertisement -

पुणे, दि. १: राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, नाक्यावरील कामगारांकरीता कामगार निवारा उभारणार आहे, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे  यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सतिश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व जन आरोग्य संचालनालय पुणे विभागाचे संचालक एम. आर. पाटील,  बाष्पके विभाग पुणे विभागाचे संचालक डी. पी. अंतापुरकर, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

डॉ. खाडे म्हणाले, कामगारांना हक्काच्या सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्यात येईल. कामगारांना आरोग्यविषयक सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी राज्यात ६ मल्टीस्पेशालटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात असे रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

कामगारांचा अपघात झाल्यावर त्यांचा कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी विमा कंपनीबाबत योजना तयार करण्यात येत आहे. सुरक्षा मंडळातील कर्मचारी, अर्धवेळ काम करणाऱ्या कामगाराला एक हजार रुपये  वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. खाडे पुढे म्हणाले, कामगारांना शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले असून ही पुस्तिका सर्व तालुक्यात पोहोचविण्यात यावी. कामगारांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन देणार असून याकरिता या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून सल्ला घेण्यात येईल. प्रामाणिकपणे काम करा, उद्योगवाढीसाठी प्रयत्न करा. उद्योग टिकला तर कामगार टिकेल असा संदेश देत त्यांनी कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहनही  केले.

कामगार भूषण आणि गुणवंत कामगाराची घोषणा

यावेळी मंत्री डॉ. खाडे यांनी कामगार भूषण आणि गुणवंत कामगारांची घोषणा केली. लवकरच मुबंई येथे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खासदार श्री. बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्याची, कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते. कामगारांना हक्काचे घर, मोफत उपचार, विमा, पाल्याना शिष्यवृत्ती, सुरक्षा आदी सुविधा शासनाच्या वतीने पुरविण्यात येत आहे

श्रीमती सिंघल म्हणाल्या, औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. कामगारांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

श्री. देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले, केंद्र आणि राज्य शासन कामगार कल्याणासाठी विविध लोककल्याणकारी कायदे करुन त्यांचे जीवनमान सुखकर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबियाचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी सामाजिक सुरक्षा, आरोग्य योजना, आर्थिक, शैक्षणिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येत आहे.

आमदार श्रीमती खापरे आणि श्रीमती जगताप यांनीही विचार व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

बाष्पके संचालनालयाच्या बाष्पके कामगारासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने तयार करण्यात आलेली चलचित्रफीत दाखविण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, अजित अभ्यंकर, बाबा कांबळे, केशव घोळवे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना २ लाख रुपये अर्थसहाय्य, बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसाला ५ लाख रुपये, नैसर्गिक मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसाला २ लाख रुपये,  बांधकाम कामगारांच्या नैसर्गिक मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस २४ हजार रुपये, अत्यंविधीकरीता १० हजार रुपये, कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वाटप,  शिवणयंत्र वाटप करण्यात आले.  घरेलू कामगाराना मदत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

0000

- Advertisement -