
मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वतीने राज्यभरातील १०४९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले.
या वेबिनारमध्ये ५०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त सांगितले.
दक्षिण मुंबईतील इयत्ता नववीतील ११ विद्यार्थ्यांनी स्वतः एक ५ तासांचा मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केला आहे, जो महाराष्ट्रभरातील युवकांना कोडिंग आणि रोबोटिक्स शिकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. उपक्रमाचे कौतुक करत या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व त्यांचे ज्ञान हजारो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी प्रेरणा दिली.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला. वेबिनारमध्ये ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ क्षेत्राचे महत्त्व, संधी आणि भविष्यातील रोजगाराच्या शक्यता यावर चर्चा करण्यात आली. टीम सिग्मा या विद्यार्थ्यांनी वेबिनारमध्ये या क्षेत्रातील संधींचे सखोल मार्गदर्शन केले.
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले, “ही मुले पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि त्यानंतर अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, याचा मला अभिमान आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! कोडिंग आणि रोबोटिक्ससारख्या नाविन्यपूर्ण क्षेत्रात आजची युवा पिढी सक्रिय सहभाग घेत आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी स्वतः संकल्पना तयार करून राज्यभरातील ITI विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलली आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारामुळे, राज्यभरातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्राथमिक शिक्षण आता सहज उपलब्ध झाले आहे.
००००
संध्या गरवारे/विसंअ