Home बातम्या आंतरराष्ट्रीय राज्यातील हजारो तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ ,तमाशा कलावंतांना कोणी वालीच नाही

राज्यातील हजारो तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ ,तमाशा कलावंतांना कोणी वालीच नाही

रांजणी – महाराष्ट्राची लोककला म्हणून लोकमान्य पावलेल्या लोकनाट्य अर्थात तमाशाची अत्यंत बिकट अवस्था आहे. चालू वर्षी तर करोनाच्या प्रादुर्भावामुळे तमाशा फड मालकांचा यात्रांचा हंगाम पुर्णत: वाया गेला. अशा परिस्थितीत लोकप्रबोधनाचे कार्य करत असलेल्या राज्यातील हजारो तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. अर्थात राज्यसरकारही तमाशा कलावंतांसाठी केवळ घोषणा करते मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याची भावना तमाशा फड मालकांमध्ये आहे. त्यामुळे गेल्या तीन शतकांपासून चालत आलेल्या तमाशाला कोणी वाली नसून तमाशा कलावंतांवर उपासमारी ओढवली आहे. जर तमाशाबाबत राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या काही उपाययोजना केल्या नाही तर निश्‍चितच महाराष्ट्राची ही लोकपरंपरा संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही.

लावणी स्पर्धेसाठी चालते, ही महाराष्ट्राची लोककला आहे, तर तमाशा हा लोकप्रबोधनाचा प्रमुख आणि प्रभावी आधार आहे.
अशी स्तुतीसुमने आज शासनकर्त्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्व जण करतात. तमाशा ही कला आजवर टिकवून ठेवणारे आणि त्याच कलेवर आपली उपजीविका चालविणारे नर्तकी, नाचा, ढोलकीवादक आदींवर सध्या आर्थिक संकटाचे सावट आहे. लोककलावंत हे गोंडस नाव आज ज्यांचे पोट भरण्यास पुरेसे नाही त्यांच्याशी संवाद साधताना लोकांना स्वत:ची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत आहे. राज्यात किमान दहा हजारांहून अधिक लोककलावंत आहे; परंतु लॉकडाउनमध्ये त्यांना अर्थातच तमाशाच्या खेळांवर बंदी असल्याने या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांची दखल सरकार दरबारी देखील कोणी घेताना दिसत नाही.

राज्यातील 145 फडमालक आर्थिक अडचणीत
चालू वर्षी करोनाच्या महामारीमुळे तमाशा फड मालकांना गावोगावी आपल्या तमाशाची कला यात्रा हंगामात साजरी करता आली नाही. त्यांनी कलावंतांच्या पगारासाठी आणि तमाशाच्या भांडवलासाठी खासगी लोकांकडून उसनवार घेतलेल्या पैशाची परतफेड देखील या तमाशा फडमालकांना करता न आल्याने राज्यातील सुमारे 145 तमाशा फडमालक आर्थिक अडचणीत आले आहेत.

सरकारच्या सांस्कृतिक विभागाने तमाशा फडमालकांना आर्थिक पॅकेज देण्याचे काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. मात्र तमाशा फड मालकांना आर्थिक पॅकेज देण्याचा सरकारला विसर पडला आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात सरकारने तमाशा फड मालकांना आर्थिक पॅकेज दिले तर फडमालकांबरोबरच तमाशात काम करणाऱ्या कलाकारांचीही आर्थिक गैरसोय दूर होईल आणि या कलाकारांचा उपासमारीपासून बचाव होईल.
-मोहित नारायणगावकर.
तमाशा फडमालक,
विठाबाई मांग नारायणगावकर यांचे नातू