
१ कोटी रूपयांची राज्य शासनाकडून तरतुदीची घोषणा
नांदेड दि. २३ फेब्रुवारी : येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाने अव्वल राहत जेते पद पटकावले आहे. दुसरा क्रमांक यजमान छत्रपती संभाजी नगरला तर पुणे विभागाला तिसरा क्रमांक मिळाला. रविवारी सायंकाळी झालेल्या समारोप कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महसूल मंत्र्यांनी दरवर्षी ही स्पर्धा घेण्याचे व त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली.
दोन हजारावर अधिकारी -कर्मचारी क्रीडापटूंचा तीन दिवसांचा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा महोत्सव आज सायंकाळी थाटात संपन्न झाला. वैयक्तिक,सांघिक आणि मिश्र अशा विविध क्रीडा प्रकारामध्ये नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे ,नाशिक ,कोकण तसेच नोंदणी मुद्रांक व भूमि अभिलेख विभाग अशा एकूण सात विभागांमध्ये 83 क्रीडा प्रकारात लढती झाल्या.
21 तारखेपासून दोन हजार खेळाडू विविध मैदानावर लढत देत होते. तर 21 व 22 तारखेला यशवंत कॉलेज मैदानावर सायंकाळी या सर्व खेळाडूंनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. डोळ्याचे पारणे फेडणारे रंगमंच आणि अतिशय व्यावसायिकतेने सादर केलेली प्रत्येक कलाकृती यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी ठरला.सांस्कृतिक स्पर्धेमध्ये नाशिक विभागाने प्रथम, कोकण विभागाने द्वितीय व नागपूर विभागाने तृतीय पुरस्कार मिळवला.
संचलन लक्षवेधी
या स्पर्धेमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेले संचलन हे देखील एक उपलब्धी ठरली आहे. यजमान छत्रपती संभाजी नगरने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक नाशिक तर तृतीय क्रमांक कोकण विभागाने पटकावला.
83 क्रीडा प्रकारात भिडंत
क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, धावणे, चालणे, जलतरण, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, लॉन टेनिस, बॅडमिंटन,गोळा फेक, थ्रो बॉल, थाळीफेक, भालाफेक, रिंग टेनिस, जलतरण, संचलन अशा 15 क्रीडा प्रकारामध्ये पुरुष, महिला व मिश्र संघ , 45 वर्षांवरील संघ,असे एकूण 82 क्रीडाप्रकार होते. तसेच सांस्कृतिक आयोजन अशा एकूण 83 घटकातून गुणानुक्रमांक देण्यात आले.यामध्ये कोकण विभागाने सर्वाधिक ३४१ गुण मिळवले. तर त्या पाठोपाठ यजमान छत्रपती संभाजी नगरने २२७ गुण मिळवले तर तिसऱ्या क्रमांकावर २१७ गुणांसह पुणे विभाग राहिला.
दरवर्षी होणार क्रीडा स्पर्धा : महसूलमंत्री
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी संबोधित करताना बारा वर्षानंतर नांदेडमध्ये या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र यापुढेही क्रीडा स्पर्धा दरवर्षी घेतली जाईल. यासाठी राज्य शासन एक कोटीची तरतूद करेल अशी घोषणा केली. तसेच नियुक्ती आणि पदोन्नती देताना क्रीडापटूंना अग्रस्थान दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
व्हाट्सॲप ग्रीव्हियन्स ॲप लोकार्पित
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना तक्रारी करता येईल अशा पद्धतीचे व्हाट्सअप ग्रिवियन्स ॲप आज महसूल मंत्र्यांच्या हस्ते नांदेडच्या नागरिकांना लोकार्पित करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कल्पकतेतून ही सुविधा नागरिकांना बहाल करण्यात येत आहे. 9270101947 व्हाट्सअप क्रमांकावर आपली तक्रार, मागणी, म्हणणे पाठवता येणार आहे. याला प्रतिसाद येणारी यंत्रणा उद्यापासून कार्यान्वित होणार आहे.
यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी महसूल मंत्र्यांनी १२ वर्षानंतर या स्पर्धा पुन्हा सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले. पालकमंत्री म्हणून इतक्या मोठ्या आयोजनात माझं दायित्व असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
बक्षीस वितरणाच्या या कार्यक्रमाला खासदार डॉ.अजित गोपछडे,आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आ. तुषार राठोड,आ. राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलिप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक शाहाजी उमाप, छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलिप स्वामी, धाराशिव जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा,अपर आयुक्त महसूल श्रीमती नयना बोंदार्डे, अपर आयुक्त प्रदीप कुळकर्णी, अपर आयुक्त कोकण नितीन महाजन, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
०००००