Home ताज्या बातम्या राज्यात पावसाचा कहर; खान्देशाला पुराचा सर्वाधिक फटका, अनेक गावं पाण्याखाली

राज्यात पावसाचा कहर; खान्देशाला पुराचा सर्वाधिक फटका, अनेक गावं पाण्याखाली

0

राज्यात काल पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरपरिस्थिती कायम होती. मुंबई-ठाणे, कोकण, कोल्हापूर, सांगली, पुणे, पिंपरी चिंचवड तसंच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात नद्या नाल्यांना आलेला पूर कायम होता.

खान्देशला पूराचा सर्वाधिक फटका बसला असून या ठिकाणची अनेक गाव पाण्याखाली आहेत. कोकणात सिंधुदुर्ग मधल्या राजापूर इथं काल एकाचा बुडून मृत्यु झाला, नाशिक जिल्ह्यातही दोन जण पुरात वाहून गेले. कोल्हापूर जिल्ह्यात पाचहजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

सांगली आणि साताऱ्यातही पूरपरिस्थिती असून, जिल्ह्यातल्या १०७ गावांचा संपर्क तुटला आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळा आणि मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं पुणे शहर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि दौंड तालुक्यातल्या नदीकाठच्या कुटुंबातल्या सुमारे १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातलं कोपरगाव पुराच्या वेढ्यात आहे.

नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातल्या उंबरमाळ गावालगत असलेल्या डोंगराला मोठ्या प्रमाणात काल सायंकाळी तडे पडलेले आहेत.नाशिक शहरातले पाच वाडे काल रात्री साडे ११ वाजेच्या सुमारास कोसळले. नाशिक जिल्ह्यात पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली असून, सर्व धरणं ६७ टक्क्यांपेक्षा जास्त भरली त्यामुळे जायकवाडीच्या दिशेनं पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता २७ टक्के इतकी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मधली बाबतारा, भालगाव, डोणगाव आणि लाखगंगा इथल्या अनेक घरात पाणी शिरलं. गंगापूर तालुक्यात हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळं वैजापूर आणि गंगापूर या तालुक्यात सुरक्षेच्या कारणास्तव महावितरण कंपनीनं बंद केलेला २३ गावातला वीजपुरवठा अजुनही बंदच आहे. कंपनीनं या दोन्ही गावांसह एकूण ५२ गावांचा वीज पुरवठा बंद केला होता, त्यापैकी २९ गावांचा वीज पुरवठा काल सुरू करण्यात आला.

दरम्यान संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरचे वीज संच, रोहित्र आणि विद्युत वाहिनी हाताळू नये, असं आवाहन कंपनीनं केलं आहे.