मुंबई, दि. १६ : राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्य लसीकरण कृती दलाच्या बैठकीत देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
२८ जून २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या तयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील अंदाजे १ कोटी २ लाख ९१ हजार ८१६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ८९ हजार ४८९ लसीकरण बूथ, २ लाख ७६ हजार १६१ घरभेट पथक दिवस, २६ हजार ५३० संक्रमण पथक दिवस, १३ हजार ५१८ मोबाईल पथक दिवस आणि ५८६ रात्रीची विशेष पथके कार्यरत राहणार आहेत.
महाराष्ट्राने पोलिओ निर्मूलन मोहिमेत उल्लेखनीय यश मिळविले असून राज्यातील शेवटची पोलिओची नोंद झालेली घटना सप्टेंबर २०१० मध्ये बीड जिल्ह्यात आढळली होती. भारतातील शेवटचे पोलिओचे प्रकरण जानेवारी २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये नोंदविण्यात आले होते. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने २७ मार्च २०१४ रोजी भारताला पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले.
बैठकीत गोवर-रुबेला निर्मूलन कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत राज्यात एमआर पहिला डोस ९९.६ टक्के तर एमआर दुसरा डोस ९९.४ टक्के इतका लसीकरणाचा दर नोंदविण्यात आला. तथापि, काही जिल्ह्यांमध्ये गोवरचे उद्रेक झाल्याने लसीकरणाबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आढावा घेताना राज्यातील एकूण ९ लाख ८४ हजार ४१४ लाभार्थ्यांपैकी ६३ हजार ७४७ मुलींना लस देण्यात आल्याची माहिती सादर करण्यात आली. राज्यातील मोहिमेची सरासरी प्रगती ६.४८ टक्के असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या सक्रिय सहभागातून या मोहिमेला अधिक गती देण्याचे ठरविण्यात आले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण, महिला व बालविकास, नगरविकास, ग्रामविकास, अल्पसंख्याक विकास, पंचायत राज, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण, इतर मागास बहुजन कल्यांण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहायय , माहिती व जनसंपर्क तसेच रेल्वे विभाग यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यावर बैठकीत भर देण्यात आला.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी आरोग्य आयुक्त डॉ. सुनिल भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. दिगंबर कानगुले, सहाययक संचालक डॉ. प्रविण वेदपाठक आणि राज्य कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर नियमित आढावा बैठका घेण्याचे तसेच कामगिरीत सुधारणा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ






















WhatsApp