मुंबई दिनांक ५ :- राज्यात नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांमुळे झालेल्या घटनामुळे मानवी जीवितहानीपासून बचावासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या माध्यमातून जानेवारी २०२६ पासून आत्तापर्यंत १६९८ अलर्ट पाठविण्यात आले. तसेच वीज पडणे, अतिवृष्टी आणि भूस्खलनासंदर्भातील २८५ अलर्ट जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची २३ पथके कार्यरत
विभागामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार हवामान खात्याकडून प्राप्त होणाऱ्या पूर्वसूचना आणि रिअल-टाईम अलर्टच्या आधारे स्थानिक प्रशासनाला तात्काळ सूचना देण्यात आल्या तसेच नागरिकांना सतर्क करण्यासाठी इशारे देण्यात आले. राज्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा सामना करताना नागरिकांचा जीवित हानीपासून बचाव करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांची एकूण २३ पथके विविध संवेदनशील जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये एनडीआरएफ १७ आणि ६ पथकांचा समावेश असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित बचाव व मदतकार्य करता आले आहे.
सर्वाधिक ४ एनडीआरएफ पथके मुंबईत तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय पालघरमध्ये १, नागपूरमध्ये २, पुणे (मुख्यालयासह) येथे २, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर येथे प्रत्येकी १ एनडीआरएफ पथक तैनात आहे. एसडीआरएफची ६ पथके अनुक्रमे धुळे (मुख्यालय) येथे २, नागपूर (मुख्यालय) येथे २, नांदेड येथे १ आणि गडचिरोली येथे १ तैनात करण्यात आली आहेत. शासनाने जिल्हा प्रशासन, आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात आहे.
जून व जुलै महिन्यात ८४ जीवित हानी
वीज पडणे, भिंत कोसळणे, झाड पडणे, पुराच्या पाण्यात वाहून जाणे आणि दरड कोसळणे या घटनांमध्ये जून व जुलै महिन्यात जीवितहानीच्या ८४ घटना घडल्या आहेत. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरापासून बचाव करताना विविध जिल्ह्यात बचाव व मदत कार्य करण्यात आले. यामुळे सरासरी पेक्षा जास्त पाऊस होत असून देखील जीवित व पशुधनाची हानी कमी झाली आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये १३७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ५०५ पशुधनाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पालघर, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, सिंधुदुर्ग गडचिरोली, भंडारा यासह विविध जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीत एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने बचावकार्य करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.
७ ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम
भारतीय हवामान विभागाच्या ७ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यांत सुरुवातीच्या दिवसांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यतासह पाऊस तर मुंबई महानगर, कोकण घाट विभागात, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील पावसाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.
राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. वीजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि आवश्यक नसल्यास पूरप्रवण व धोकादायक भागात जाणे टाळावे. तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गाबाबत स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणारे इशारे याबाबत नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
0000
किरण वाघ/विसंअ





















WhatsApp