Home ताज्या बातम्या राज ठाकरेंचा नारायण राणेंना फोन; मंत्रिपद मिळाल्याबद्दल केलं अभिनंदन

राज ठाकरेंचा नारायण राणेंना फोन; मंत्रिपद मिळाल्याबद्दल केलं अभिनंदन

0
राज ठाकरेंचा नारायण राणेंना फोन; मंत्रिपद मिळाल्याबद्दल केलं अभिनंदन

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनंदन केलं आहे. तसंच, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसेना, काँग्रेस, स्वत:चा स्वाभिमान पक्ष आणि आता भाजप असा प्रवास करणारे नारायण राणे यांना मोदी सरकारमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यात काल झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना त्याच अनुषंगानं प्रश्न विचारण्यात आला होता. आपण नारायण राणे यांना फोन केला होता का, असा त्यांना विचारण्यात आलं. त्यावर, मी त्यांना फोन केला होता. मात्र, त्यांचे दोन्ही फोन बंद होते. त्यांच्या मुलांचेही फोन बंद होते. त्यामुळं शुभेच्छा देता आल्या नाहीत. पुन्हा फोन करेन, असं ते काल म्हणाले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी नारायण राणे यांच्याशी फोनवरून चर्चा केली व मंत्रिपदाबद्दल अभिनंदन केले.

वाचा: महाविकास आघाडीत काँग्रेसची पुन्हा कोंडी? नेमकं काय झालं?

नारायण राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून राज ठाकरे यांचे सहकारी होते. उद्धव ठाकरे यांच्याशी फारसे पटत नसले तरी शिवसेनेत असताना राणे यांचे राज ठाकरेंशी उत्तम संबंध होते. शिवसेना सोडल्यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होता. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर राणे त्यांच्यासोबत जातील, अशाही चर्चा होत्या. मात्र, तसं झालं नाही. शिवसेना सोडल्यापासून नारायण राणे व त्यांची दोन्ही मुलं शिवसेनेवर, उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं टीका करताना दिसतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून या टीकेची धार वाढली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्यावर राणेंनी कधीच टोकाची टीका केलेली नाही. राज यांनीही राणेंवर टीका करणं टाळलं आहे.

‘उद्धव ठाकरेंनी अभिनंदन केलं का?’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं अभिनंदन केलं का, असा प्रश्न नारायण राणे यांना दिल्लीतील पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यावर, अभिनंदन करण्यासाठी मन मोठं लागतं, असं खोचक उत्तर राणेंनी दिलं होतं.

वाचा: सहकार खात्यामुळं महाराष्ट्रात भाजप सरकारची स्थापना?; शिवसेना म्हणते…

Source link