हायलाइट्स:
- राज कौशल यांची ही इच्छा अपुरीच राहिली
- अभिनेता रॉनित रॉयने मुलाखतीमध्ये दिली माहिती
- राज यांच्या जाण्याचे दुःख शब्दांत मांडू शकत नाही-रॉनित
त्याच्या जाण्याचे दुःख शब्दांत मांडू शकत नाही
राज कौशल ख्यातनाम निर्माता-दिग्दर्शक होते. त्यांनी तीन सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. परंतु हे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत. रॉनितने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. रॉनितने सांगितले, ‘राज यांच्या अचानक जाण्यामुळे मनाला ज्या वेदना होत आहेत, त्या शब्दांत मांडणे खूपच अवघड आहे. आज तो आपल्यात नाही यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही.’
राज यांची ही इच्छा राहिली अपुरी
रॉनितने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, ‘ मे महिन्यात मी आणि राज गोव्यामध्ये होते. त्यावेळी एक वेब सीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन करायची असल्याची इच्छा राजने त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याने वेब सीरिजच्या कामाला सुरुवात देखील केली होती. त्याची ही वेब सीरिज एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार होती.’ रॉनितने पुढे सांगितले, ‘या वेब सीरिजमध्ये मला त्याने एक प्रमुख भूमिका करायला सांगितले होते. या सीरिजच्या पहिल्या भागामध्ये माझी भूमिका होती. त्यासाठी त्याला माझ्यासोबत चित्रीकरण करायचे होते.’
राजला मला मास्टरमाईंड करायचे होते
रॉनितने पुढे सांगितले, ‘राज ज्या कथेवर वेब सीरिज करत होता. ती दोन भागांत तयार होणार होती. त्याच्या दुस-या भागामध्ये मला त्याने मोठी भूमिका दिली होती. तो मला या सीरिजमध्ये मास्टरमाईंटच्या भूमिकेत बघत होता. ही व्यक्ती कायम पडद्यामागे राहून काम करणारी असते. परंतु सीरिजच्या पहिल्या भागाच्या शेवटी हा मास्टरमाईंड प्रेक्षकांसमोर येणार होता…’
चित्रीकरण सुरू होण्याआधीच राज गेला
परंतु दुर्दैवाने या सीरिजचे चित्रीकरण सुरू होण्याआधीच राज कौशल यांचे निधन झाले. त्यामुळे या सीरिजचे चित्रीकरण सुरूच होऊ शकले नाही. याबाबत रॉनितने सांगितले, ‘ या सीरिजबाबत आमचे केवळ बोलणे झाले होते. आम्ही चित्रीकरण करू शकलो नाही. मला असे वाटते की या सीरिजबद्दल दुस-या निर्मात्यांशी राजचे बोलणे सुरू होते. त्याचवेळी तौक्ते वादळ आले आणि हे काम अपूर्णच राहिले…’
‘अक्कड बक्कड’ नाव होते वेब सीरिजचे
रॉनित रॉय ज्या वेब सीरिजबद्दल बोलत होते, त्याचे नाव ‘अक्कड-बक्कड’ असे होते. राज कौशल हे या वेब सीरिजचे निर्माता आणि दिग्दर्शक होते. ही सीरिज एक क्राईम-ड्रामवर आधारीत आहे. त्यामध्ये मनीष चौधरी यांच्यासोबत मोहन आगाशे, दीपराज राणा आणि शिशीर शर्मा हे कलाकार काम करत आहेत. राज यांनी कायमच आपल्या प्रोजेक्टमधून नवीन कलाकारांना संधी दिली आहे. या सीरिजमध्ये देखील त्याने अनुज रामपाल, विकी अरोरा, श्रेया मुथुकुमार आणि अलिशा चोप्रा हे नवीन चेह-यांचा समावेश होता. राज यांच्या निधनामुळे या सीरिजचे काम सध्या तरी बंद आहे.