Home बातम्या राजकारण राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

0

कणकवली : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आज सिंधुदुर्गात दोन प्रचार सभा घेणार आहेत. कणकवलीत सतीश सावंत आणि वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी या सभा आहेत. कणकवलीत भाजपाचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सतीश सावंत हे आमने सामने असल्यामुळे उध्दव यांची कणकवलीतली सभा विशेष महत्वाची आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवलीत नितेश राणे यांच्यासाठी सभा घेवून शिवसेनेवर जराही टिका न करता नितेश राणेना 80% मतं मिळतील असा दावा केला होता.  पण राणे आणि शिवसेनेचं भांडण पाहता उध्दव ठाकरे कणकवलीच्या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे यांनी पहिल्यांदाच शिवसेनेसोबत कटुता संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी पुढे यायला तयार आहे. मात्र शिवसेनेनेही हात पुढे करावा असं राणे म्हणाले होते. शिवसेनेने माझ्यावर हल्ले सुरूच ठेवले तर माझ्याही सहनशक्तीचा अंत संपेल असं बोलायलाही ते विसरले नाही. त्याआधी नितेश राणे यांनी पहिल्यांदा आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचं स्वागत करत आदित्यच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जुनं राजकीय भांडण आणि कटुता संपवून नवी सुरूवात करायला पाहिजे असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंना दिला होता असं त्यांनीच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. किती दिवस या गोष्टी सोबत घेऊन वाटचाल करायची. आता पिढी बदललीय, नव्या गोष्टींची सुरूवात केली पाहिजे असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी राणेंना दिला होता.

त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेवर कुठलीही टीका करणार नाही असंही राणेंनी आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालत जाहीर केलं. आम्ही विकास कामांवर निवडणूक लढवतोय. कुणी कितीही भडकविण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही विचलीत होणार नाही असंही राणे यांनी म्हटलंय. त्यामुळे आजच्या कणकवलीतल्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात त्याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय.