Home ताज्या बातम्या रात्रीच्या प्रवासात दोन महिलांनीच केलं “ती ” चं बसमध्ये बाळंतपण..

रात्रीच्या प्रवासात दोन महिलांनीच केलं “ती ” चं बसमध्ये बाळंतपण..

0

शिरूर : रात्रीचे बारा वाजलेलं.. बस बंद पडलेली..काळा कुट्ट अंधार दाटलेला.. अशावेळेस बसमधे एका महिलेला असाह्य प्रसृती वेदना सुरू होतात. मदत मिळत नाही मात्र त्या प्रवाशांमधील दोन रणरागिणी पुढे सरसावतात व त्या महिलेची सुखरूप प्रसुती करत तिचा व बाळाचा जीव वाचवितात . ही हृदय हेलवणारी घटना घडली पुणे नगर महामार्गावरती सुपा गावाजवळ .
रविवारी (दि.१६) सायंकाळी ८ वाजता संगम ट्रॅव्हल्सचा बस ( एमएच १९ वाय.६१२७ ही गाडी निगडी भोसरी मार्ग अकोला या जिल्हयासाठी निघाली होती.सव्वा सहाची बस आठला निघाली होती . त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले होते . याच गाडीमधे भोसरी परिसरात राहणारी यशोदा विलास पवार ही गर्भवती महिला लोणार येथे गावी जाण्यासाठी निघाली होती . गाडी नगरच्या दिशेने धाऊ लागली होती . बस खड्ड्यात गेली की आदळत होती . त्यामुळे यशोदा यांना त्रास होऊ लागला. शिरूरपर्यंत तिच्याकडे कुणी लक्ष दिले नाही . शिरूर ओलांडून पुढे बस धावत होती. तश्या त्या वेदनेने घायाळ होत होत्या . अचानक सव्वा बाराच्या दरम्यान सुपा ( ता. पारनेर ) टोल नाक्याजवळ गाडी रस्त्यांतच बंद पडली . प्रवाशी खाली उतरले. मात्र , ही महिला गाडीतच जीवघेण्या वेदना सहन करीत होती . सोबत कुणीही ओळखीचे नातेवाईक नव्हते . तिला प्रचंड कळा सुरू होत्या. गाडीत अंधार झाला होता . तिच्या मदतीला कोणी येईना. मात्र त्याच बसमधील प्रवाशी असलेल्या पुण्यावरून अकोला येथे निघालेल्या सोनाली दिलीप कावडे पुढे सरसावल्या. त्या महिलेला धीर देऊ लागल्या. त्यांच्या मदतीला पुनम रामदास राऊत ( पातुर ) ही तरुणी मदतीला धावल्या बसमधेच सिटवर महिलेला झोपुन दोन्ही तरुण रणरागिणींनी या महिलेची प्रसुती केली . तिला मुलगी झाली . या दोन रणरागिणीमुळे महिला व बाळाचे प्राण वाचले हे मात्र खरे. त्यानंतर डॉक्टराशी संपर्क साधण्यात आला येथील डॉक्टर विलास काळे यांनी येऊन बाळाची नाळ कापली व दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले . आई व मुलगी दोघेही सुखरूप आहेत. मात्र त्या दोघी माई लेकीसाठी खऱ्या अर्थाने सोनाली व पुनम देवदूत ठरल्या आहेत .
या घडामोडी रात्रभर घडत होत्या. बस बंद पडल्याने चालक पळुन गेले. प्रवाशी रात्रभर थंडीत कुडकुड करीत होते . सोनाली यांनी बस मालकाशी संपर्क साधला. मात्र त्यांनी कोणतीही मदत दिली नाही रात्री सव्वा बारा वाजता थांबलेले प्रवाशी सकाळी साडे दहा वाजता दुसरी बस आल्यानंतर अकोल्याकडे रवाना झाली .मात्र या दोन रणरागिनीच्या कार्याला डॉक्टरसह प्रवाशांनी सलाम केला .
…………….
खासगी बस संगम ट्रॅव्हल्समधुन प्रवास करणारी गर्भवती महिला मरणयातना भोगत असताना चालक पळुन गेला मालकानी फोन बंद केला. ही घटना क्रुर असुन खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशी महिलेच्या जीवाशी खेळत असुन त्यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे यांनी केली आहे.

आम्ही आमचं कर्तव्य पार पाडले.
पवार माय लेकीना जीवदान देणाऱ्या सोनाली कवाडे व पुनम राऊत म्हणाल्या की, एक बहीण व बाळाचा जीव वाचऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडले . मात्र खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीमुळे आम्हाला रात्रभर थंडीत कुडकुडत राहावं लागते. तब्बल दहा तास रस्त्यावर प्रवाशी थांबले. मात्र, ट्रॅव्हल्स कंपनीकडुन कोणतीही मदत झाली नाही. एवढी माणुसकी हरवलीय का असा सवाल या रणरागिनीनी केला आहे.