Home शहरे कोल्हापूर राधानगरी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात मोठा स्फोट, वीजनिर्मिती ठप्प

राधानगरी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात मोठा स्फोट, वीजनिर्मिती ठप्प

0

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीजनिर्मिती केंद्रात घुसले. पाणी घुसल्याने मोठा स्फोट होऊन वीज निर्मिती ठप्प झाली आहे. या ठिकाणच्या महापारेषणच्या ११० केव्हीचे अतिउच्चदाब उपकेंद्रांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आल्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व वाहिन्याही बंद झाल्या आहेत.

महापारेषणकडून महावितरणच्या राधानगरी, सोळांकूर व कसबा तारळे ३३/११ केव्ही उपकेंद्रांना मिळणारा वीजपुरवठा खंडित झाला असून दुसऱ्या मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आपत्कालीन दरवाजातून होणारा विसर्ग कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाला विनंती करण्यात आली आहे. रात्रभर राधानगरी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ होतेय.

पावसामुळे कोल्हापुरातील शाळांना मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचा फटका बसलेल्या शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंचगंगेला पूर आल्याने २०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. काही गावांतील विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.