Home शहरे अकोला रायगड जिल्ह्यातील रामेती या संस्थेला विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्याची कार्यवाही करावी

रायगड जिल्ह्यातील रामेती या संस्थेला विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्याची कार्यवाही करावी

0
रायगड जिल्ह्यातील रामेती या संस्थेला विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देण्याची कार्यवाही करावी

मुंबई, दि. 8 : रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) खोपोली या संस्थेला विभागीय प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.

मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील रामेती, खोपोली या संस्थेला विभागीय प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळावी याबाबत सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, सामान्य प्रशासन सेवाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, यशदाचे महासंचालक ए.एस.चोकलिंगम, कृषि विभागाचे उपसचिव हे.मो.म्हापणकर,महसूलचे उपसचिव अजित देशमुख,कोकण विभागाचे उपायुक्त मकरंद देशमुख,कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, रायगड जिल्ह्यातील रामेती खोपोली या संस्थेला विभागीय प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता रद्द झाली होती ती पुन्हा मिळावी याबाबत वारंवार मागणी व प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला पाठविलेला आहे. याबाबतीत कृषि, सामान्य प्रशासन विभाग व यशदाने समन्वयाने काम करून कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. भरणे यांनी बैठकीत दिले.

रामेती खोपोली या संस्थेची मान्यता पुन्हा मिळावी – राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, भौगोलिकदृष्ट्या रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर व मुंबई शहर या पाच जिल्ह्यांसाठी प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) खोपोली ही अत्यंत जवळची असून या संस्थेकडे प्रशिक्षणांचा आवश्यक तेवढा अनुभव, तज्ज्ञ मार्गदर्शक व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या संस्थेस पुन्हा मान्यता देण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी बैठकीत केली.

*****

संध्या गरवारे/विसंअ/