मुंबई, दि.2: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, उप सचिव विलास आठवले, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती यांचे औचित्य साधून विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधानमंडळ सचिवालयात आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष यांनी दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 पर्यंत चालणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन केले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्रामार्फत स्माआरोग्य हेल्थकेअर संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी प्रधान सचिव, राजेंन्द्र भागवत, कल्याण केंद्राचे सरचिटणीस, मनिष पाटील, राजपत्रित अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष, अजय अग्रवाल, स्माआरोग्याचे संचालक अरुण रामचंद्र, डॉ.सुजाता अरुण यावेळी उपस्थित होते. उपसचिव विलास आठवले, म.वि.स. यांनी प्रथम तपासणी केली. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर यांनी सर्वांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि “उत्तम कार्यक्षमतेसाठी उत्तम आरोग्याची उपासना करावी,” असे आवाहन केले.