
मुंबई, दि. ७ : केंद्र शासनाने २०२२ मध्ये सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके (आयपीएचएस) जारी केली आहेत. त्यानुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, अस्थिरोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा शल्यचिकित्सक आणि फिजिशियन यांना नॉन-टीएसपी क्षेत्रात एक लाख रुपये, तर टीएसपी क्षेत्रात एक लाख १५ हजार रुपये निश्चित मासिक मानधन मिळेल. निर्धारित कामगिरीनुसार निश्चित आणि कामगिरीआधारित मानधन मिळून या तज्ज्ञांचे एकूण मासिक मानधन कमाल तीन लाख ५० हजार रुपयांपर्यंत राहील. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यरत आणि सेवानिवृत्त तज्ज्ञांच्या बैठकीतून क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेण्यात आला. यापूर्वी या विषयावर जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना रद्द करण्यात आल्या आहेत.
पूर्णवेळ हृदयरोगतज्ज्ञांसाठी नॉन-टीएसपी क्षेत्रात दोन लाख ५० हजार रुपये आणि टीएसपी क्षेत्रात दोन लाख ७५ हजार रुपये निश्चित मासिक मानधन राहील. कामगिरीआधारित रकमेसह त्यांना अनुक्रमे कमाल चार लाख ५० हजार आणि चार लाख ७५ हजार रुपये मासिक मानधन मिळू शकेल. पूर्णवेळ विकृतीशास्त्रज्ञांना नॉन-टीएसपी क्षेत्रात ८० हजार आणि टीएसपी क्षेत्रात एक लाख रुपये, अर्धवेळ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांना अनुक्रमे ४० हजार व ५० हजार रुपये, तर पूर्णवेळ मूत्रपिंडविकारतज्ज्ञांना दोन्ही क्षेत्रांत एक लाख २५ हजार रुपये मानधन निश्चित केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध योजनांतील प्रथम संदर्भ सेवा केंद्रे (एफआरयू) आणि इतर रुग्णालयांमध्ये नव्याने नियुक्त किंवा पुनर्नियुक्त होणाऱ्या तज्ज्ञांना १ ऑक्टोबर २०२६ पासून सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार मानधन द्यावे, असे निर्देश आयुक्त आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान संजय काटकर यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्त्रीरोग, बालरोग, भूलशास्त्र, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, कान-नाक-घसा, औषधवैद्यक, नेत्ररोग, मानसोपचार, क्ष-किरणशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मूत्रपिंडविकार आणि हृदयरोग अशा १४ विशेषज्ञ सेवांचा समावेश आहे. भेटीवर किंवा गरजेनुसार बोलावण्यात येणाऱ्या तज्ज्ञांसाठी बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रिया, वैद्यकीय प्रक्रिया, आपत्कालीन सेवा आणि आंतररुग्ण उपचारानुसार स्वतंत्र मानधन दर निश्चित केले आहेत. बहुतेक प्रमुख शस्त्रक्रिया अथवा प्रक्रियांसाठी नॉन-टीएसपी क्षेत्रात प्रतिप्रकरण पाच हजार आणि टीएसपी क्षेत्रात सात हजार रुपये देण्याची तरतूद आहे.
निश्चित मासिक मानधनासाठी तज्ज्ञांनी संबंधित विशेषज्ञतेनुसार बाह्यरुग्ण तपासणी, आंतररुग्ण सेवा, शस्त्रक्रिया किंवा प्रक्रियाअभियानाने कालीन कॉलचे किमान कामगिरी निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. निकष पूर्ण करणाऱ्या तज्ज्ञांना निश्चित तसेच कामगिरीआधारित मानधन मिळेल. निकष पूर्ण न झाल्यास संबंधित तज्ज्ञाला केवळ प्रत्यक्ष कामगिरीवर आधारित मानधन मिळेल. नियमित तज्ज्ञांनीही हे किमान कामगिरी निकष पूर्ण करणे अपेक्षित आहे.
संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक तज्ज्ञांच्या कामगिरीचे संनियंत्रण करतील. आयपीएचएसअंतर्गत तज्ज्ञांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवर नोंदविण्यात येईल. भेटीवर किंवा गरजेनुसार बोलावण्यात येणाऱ्या तज्ज्ञांना प्रवास व दैनिक भत्ता देण्यात येणार नाही.
०००००
मनिषा सावळे/विसंअ

WhatsApp