मुंबई, दि. २७ : सुपरस्टार रेडर पुजा यादव आणि मेघा कदमने सुरेख खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात यजमान गुजरातला धुळ चारली. स्नेहलच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ४६-२२ ने दणदणीत सामना जिंकला. महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम खेळीतून गुजरातवर चार लोन मारले. यासह टीमने शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात आपले वर्चस्व राखून ठेवले. यासह महाराष्ट्र संघाला सलग दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज विजयाची नोंद करता आली. महाराष्ट्राच्या नवदुर्गांनी नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला विजय साजरा केला. प्रशिक्षक संजय मोकळ यांच्या अचुक डावपेचातून महाराष्ट्राने एकतर्फी विजय साकारला. आता महाराष्ट्र संघाला आज बुधवारी विजयी हॅटट्रिकची संधी आहे. महाराष्ट्राचा गटातील तिसरा सामना बिहारशी होणार आहे.
पुजा, मेघाची सर्वोत्तम खेळी:
महाराष्ट्र संघाने मंगळवारी गटातील दुसऱ्या सामन्यासाठी संघात एक बदल केला. बोनसची स्टार सोनाली शिंगटेला विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी पुजा यादवला संधी देण्यात आली. याच विश्वासाला सार्थकी लावताना पुजा यादवने सुरेख चढाई करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आपल्या शैलीदार चढाईतून तिने यजमान गुजरातविरुद्ध सर्वाधिक गुणांची कमाई केली. त्याचबरोबर अशाच प्रकारची तोडीसतोड खेळी मेघा कदमने केली. त्यामुळे संघाच्या मोठ्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला. यातून चार लोनने गुजरातला धुळ चाखावी लागली.
अंकिता , सायलीची अचुक पकड
महाराष्ट्र संघातील गुणवंत खेळाडू अंकिता जगताप आणि सायली जाधवची खेळी लक्षवेध ठरली. त्यांनी आपल्या अचुक पकडीतून गुजरात टीमच्या रेडरचा गडी मारण्याचा प्रयत्न वेळावेळी हाणुन पाडला. त्यामुळे गुजरात टीमला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पकडीतून अंकिता आणि सायलीने सामना गाजवला.
आज बिहारविरुद्ध विजयाची संधी :
महाराष्ट्र महिला संघाला आता गटात विजयी हॅटट्रिकची संधी आहे. यासाठी महाराष्ट्र संघ बुधवारी गटातील तिसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरणार आहे. महाराष्ट्र आणि बिहार यांच्यात सामना रंगणार आहे. यजमान गुजरातला पराभूत करून बिहारने सलामी दिली होती.
किताबाचा दावा मजबुत : शिरगावकर
महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने सलग दुसरा विजय साकारून स्पर्धेतील आपला किताबाचा दावा मजबूत केला आहे. टीमची दुसऱ्या सामन्यातील कामगिरी कौतुकास्पद ठरली. पुजा,मेघा, सायली, अंकिता यांनी लक्षवेधी खेळी केली. त्यामुळे विजय मिळवता आला.
नामदेव शिरगावकर, सचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना