भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मतदान प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली, आणि त्यानिमित्ताने देशभर जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात.
मतदान : लोकशाहीचे प्रतीक आणि राष्ट्रीय कर्तव्य
मतदानाचा हक्क बजावणे हे केवळ आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य नसून, लोकशाही टिकविण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहे. भारतातील लोकशाही निवडणूक प्रक्रिया जगभरात आदर्श मानली जाते. ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) च्या माध्यमातून आज आपली मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक झाली आहे.
लोकशाही मजबूत असेल तर देशाचा विकास सुकर होतो. म्हणूनच, प्रत्येक नागरिकाने मतदानात सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. आपले एक मत देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते.
मतदान नोंदणी : पहिला पाऊल
१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुण-तरुणीने मतदार यादीत नाव नोंदवून मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात मतदार नोंदणी सोपी झाली आहे. www.nvsp.in या वेबसाइटद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येते.
राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जसे की; प्रभातफेरी, निबंध, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा,मतदान जागृतीवर व्याख्याने, पोवाडे, पथनाट्याद्वारे जनजागृती विशेषत: तरुण पिढीला मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
लोकशाहीचे संरक्षण : आपली जबाबदारी
भारतीय निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली देशातील निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने होतात. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही सबबी न सांगता, आपला हक्क बजावणे हे आपल्या राष्ट्रप्रेमाचे खरे दर्शन आहे.
“आपले मत महत्त्वाचे आहे! चांगले राज्यकर्ते निवडण्यासाठी आजच आपली मतदार नोंदणी करा.”
मतदान हा आपला अधिकार, हक्क आणि कर्तव्य आहे. लोकशाहीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. चला, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, आपल्या समाजाला लोकशाहीचे खरे मूल्य समजावून देऊ.
आपली मतदार नोंदणी करा, देशाच्या विकासात आपले योगदान द्या!
0000
श्री. हेमकांत सोनार
रायगड-अलिबाग