म. टा. प्रतिनिधी, लोणावळाः रुग्णालयाचे बिल भरले नाही; म्हणून करोना रुग्णाचा मृतदेह तीन दिवस ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील मायमर संचलित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात घडली. या प्रकरणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
गणेश लोके (वय ५०, रा. मळवली, मावळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बिल दिले नसल्याने रुग्णालयाने मृतदेह देण्यास नकार दिला होता. गणेश लोकेंचा मुलगा सुजित लोके यांनी या धक्कादायक प्रकाराबाबत खासदार बारणे यांच्याकडे तक्रार केली होती. बारणे यांनी ‘मायमर’च्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रुग्णालयाने मृतदेह देण्याची तयारी दाखवली. बारणे यांनी या प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांचे ओएसडी, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिली.
‘बिल भरले नाही; म्हणून करोनारुग्णाचा मृतदेह तीन दिवस अडवून ठेवणे हा मायमर हॉस्पिटलमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक व गंभीर आहे,’ अशी प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी व्यक्त केली. ‘मायमर’च्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना हाकलून देण्याच्या केलेल्या भाषेचा जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी निषेध केला आहे.
‘मृतदेह अडवला, हे म्हणणे चुकीचे’
‘रुग्णालयाने बिलासाठी मृतदेह अडवून ठेवला, हे म्हणणे चुकीचे आहे. रुग्णालयाने जास्तीत जास्त रुग्णांना महात्मा फुले योजनेची; तसेच योजनेशिवाय गरजू रुग्णांना अतिरिक्त सवलत दिली आहे. सर्व बिले सरकारी नियमानुसार दिली आहेत,’ असे ‘एमआयएमईआर’ वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनाजी जाधव यांनी सांगितले.
Source link