Home अश्रेणीबद्ध रूग्णांसाठी बांधलेल्या या रुग्णालयात रुग्णांना वाऱ्यावर सोडण्याचे प्रकार

रूग्णांसाठी बांधलेल्या या रुग्णालयात रुग्णांना वाऱ्यावर सोडण्याचे प्रकार

लाखो रुपये खर्च करून शासनाने जिंतूर तालुक्यातील बोरी येथे ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत बांधली आहे मात्र रूग्णांसाठी बांधलेल्या या रुग्णालयात रुग्णांना वाऱ्यावर सोडण्याचे प्रकार या ठिकाणी वारंवार होत आहेत. ग्रामीण रुग्णालयात गीता अनिल अल्लाट ही महिला रविवार, १९ रोजी सकाळी प्रसूतीसाठी दाखल झाली होती. परंतु वैद्यकीय अधिकारी व महिला डॉक्टर उपस्थित नसल्याचा सल्ला देऊन या महिलेची तपासणी करून परिचारिकेनेच परभणीला रेफर केले.

रुग्णवाहिकेची सोयही रूग्णालय प्रशासनाने उपलब्ध करून दिली नाही. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दगडोबा वजीर यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांडगे यांना मोबाईलवरून संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. परंतु डॉक्टरांनी मोबाईल कट केल्याचा आरोप वजीर यांनी केला. त्या महिलेला प्रसूतिवेदना चालू झाल्याने वजीर व विष्णू चौधरी यांनी रुग्णवाहिका बोलावून त्या महिलेसह नातेवाईकांना परभणीस रवाना केले. या प्रकाराबद्दल ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

डॉक्टर वेळेवर न येणे, औषधांचा अपुरा पुरवठा यामुळे रुग्णांची हेळसांड होते. ‘यथा राजा तथा प्रजा’ या युक्तीप्रमाणे वैद्यकीय अधिकारीच उशिरा येतात त्यामुळे कर्मचारीही आपली मनमानी करतात. असाच प्रकार रविवारी घडला, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला असह्य वेदना होत होत्या मात्र डॉक्टर अभावी परिचारिकेने तिला तपासले व परभणीला रेफर केले रेफर केले ,तिला रुग्णवाहिकेची सोय ही कुणी करून दिली नाही. त्यामुळे नातेवाईकांसह ही महिला परभणीस जाण्यासाठी बसस्टॅन्ड कडे जात असल्याचे लक्षात येताच शेतकरी संघटनेचे दगडोबा वजीर व विष्णू चौधरी यांनी रुग्णवाहिकेचे चालक मतीन भाई यांच्याशी संपर्क करून रुग्णवाहिका बोलावून घेतली व त्या महिलेस नातेवाईक सह परभणी ला पाठवले. बोरीचे ग्रामीण रुग्णालय सध्या शोभेची वस्तू बनली असून ‘असून अडचण नसून खोळंबा’अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली आहे, याचा फटका मात्र रुग्णांना बसत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.