चित्रपटाच्या गोष्टीचा फार विचार करू नका. पडद्यावर घडणाऱ्या रंजक भयपटाचा आस्वाद घेण्याच्या दृष्टीनं त्याकडे पाहिल्यास चित्रपट तुम्हाला हसवेल आणि क्षणार्धात घाबरवेलही. छोट्या गावात राहणाऱ्या दोन तरुणांची आणि त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या एका तरुणीची ही गोष्ट आहे. भूरा पांडे () आणि कट्टानी कुरैशी () काही विचित्र परिस्थितीत रूहीला () भेटतात आणि तिच्या भोवतीच ते अडकून राहतात.
तिला आधी पाहिल्यावर असं वाटतं, की ती सरळ, साधी मुलगी आहे. पुढे तिचं दुसरंच व्यक्तिमत्त्व नायक आणि प्रेक्षकांसमोर येतं. दुसऱ्या व्यक्तिमत्त्वाचं नाव ‘अफजा’ असं आहे. कुणी तिला ‘भूत’ म्हणतं; तर कुणी ‘मुडीया पेरी’ म्हणतं. ती लग्नासाठी आतुर आहे. आता कथनकात एक अनोखा प्रेमत्रिकोण तयार होतो. भूरा रुहीच्या आणि कट्टानी हा भूत असलेल्या अफजाच्या प्रेमात पडतो. आता हा प्रेमाचा गुंता कसा सुटतो? भूराला त्याचं प्रेम मिळतं, की कट्टानीला त्याचं प्रेम मिळतं? रूही भूतापासून पिच्छा सोडवते का? या सगळ्याची उत्तरं चित्रपटात मिळतील. हॉरर कॉमेडी हा जॉनर दिग्दर्शक हार्दिक मेहतानं कुशल पद्धतीनं हाताळला आहे. राजकुमार राव, जान्हवी कपूर आणि वरुण शर्मा या तिन्ही मुख्य कलाकारांनी पडद्यावर चांगली कामगिरी केली आहे. रूही आणि अफजा ही दोन्ही पात्र जान्हवीनं शिताफीनं साकारली आहेत. तिचं काम बघता आपण इथं दीर्घकाळ टिकण्यासाठी आलो आहोत, हे जान्हवी सिद्ध करू पाहतेय. मेकअप आणि व्हीएफएक्सचं कामही उत्तम झालयं. संगीत, छायांकन आणि संकलनाचं काम उजवं आहे. ‘नदियों पार’ आणि ‘पनघट’ ही गाणी लक्षात राहतात. एकंदर चित्रपट हसवणारा आणि घाबरवणाराही आहे.
रूही
निर्मिती ः दिनेश विजन, मृगदीप सिंह लाम्बा
दिग्दर्शक ः हार्दिक मेहता
लेखन ः मृगदीप सिंह लाम्बा, गौतम मेहेरा
कलाकार ः राजकुमार राव, वरुण शर्मा, जान्हवी कपूर
छायांकन ः अमलेंदू चौधरी
संकलन ः हुझेफा लोखंडवाला
दर्जा ः २.५ स्टार